भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महत्वाचे शहर असणा-या मुंबईच्या उत्तरेला 'सॅटेलाईट टाऊनशीप' निर्माण करण्याची सूचना १९४८ मध्ये तत्कालीन महापौर मोडक समितीने केली होती. त्यांनतर फेब्रुवारी १९५९ साली एस.जी.बर्वे समितीमार्फत त्यावेळेच्या मुंबई सरकारकडे सुपुर्द केलेल्या अहवालात मुंबई शहराच्या विकासाकरीता ठाणे खाडीवर रेल्वे आणि रस्ता वाहतुकीकरीता खाडीपुल बांधण्याची शिफारस करण्यात आली होती.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची राजधानी आणि देशाचे आर्थिक केंद्र असणा-या मुंबई महानगराच्या वाढत्या लोकसंख्येला पर्याय शोधण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली. याबाबत मार्च १९६५ मध्ये नागरी समस्यांवर उपाययोजना शोधण्याकरीता शासनाने नियुक्त केलेल्या प्रा.डी.आर.गाडगीळ समितीनेही बर्वे समितीच्या शिफारसींवर शिक्कामोर्तब केले. ठाणे खाडीपलिकडे नवे शहर वसविण्याचे ठरले आणि नवी मुंबई आकारास आली. याकरीता १७ मार्च १९७० रोजी शहर आणि औद्योगिक वाकास महामंडळ अर्थात सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात येऊन ठाणे - बेलापूर पट्टीतील गांवांसह पनवेल, उरण, द्रोणागिरी अशा पट्ट्यातील ९५ गावांच्या विकासप्रक्रियेला सुरूवात झाली.

दि. १ जानेवारी १९९२ मध्ये महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील ४५ गावांच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना केली. अशाप्रकारे ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत रूपांतरीत होणारे नवी मुंबई हे देशातील बहुधा एकमेव उदाहरण असावे. १६२ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असणा-या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १९९१ च्या जनगणनेनुसार ३,९७,००० होती, त्यामध्ये वाढ होऊन सन २००१ च्या जनगणनेत ७,५०,००० इतकी झाली. हा वाढीचा दर ८८.९१ टक्के इतका लक्षणीय होता. सद्यस्थितीत महापालिकेच्या १०८ चौ.कि.मी. क्षेत्रफळात सन २०११ च्या जनगणनेनुसार ११,५०,००० इतकी लोकसंख्या आहे.

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेचे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा असे ८ प्रशासकीय विभाग करण्यात आले असून त्यांच्यामार्फत नागरी सेवासुविधापुर्ती कामांवर नियंत्रण ठेवण्यात येते. महापालिकेच्या 111 प्रभागांतून निवडून आलेले नगरसेवक प्रभागांचे प्रतिनिधित्व करतात.

आज जगातील 'सुपर सिटीज्' मध्ये नवी मुंबईचा समावेश केला जात असून '२१ व्या शतकातील शहर' म्हणून संबोधिले जाणारे हे महानगर पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, बहुआयामी शैक्षणिक सुविधा, उत्तम आरोग्य सुविधा, पर्यावरण या सर्वच दैनंदिन जीवनाशी निगडीत बाबींचा स्तर उत्तम असल्याने निवासाचा तसेच उद्योग, व्यवसायाकरीता एक उत्तम पर्याय मानला जातो.