उद्यान विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
- उद्याने ही शहराला प्राणवायु पुरविणारी फुफ्फुसे आहेत. हे लक्षात घेऊन १२,८३,९४६.०० चौ.मी. महापालिका क्षेत्रामध्ये १५६ उद्याने, ६७ मोकळ्या जागा, ८ ट्री बेल्टस्, रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण करुन त्यांचे संवर्धन व संरक्षण केले जात आहे. काही उद्याने संकल्पनांच्या आधारावर (थिम गार्डन) विकसित करण्यात आलेले आहेत. यात डॉ. केशव बळीराम हेगडेवार उद्यान (मँगो गार्डन) सीबीडी, संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन) से. २१ नेरुळ, आर.आर. पाटील उद्यान, से.१९ नेरुळ, चिकणेश्वर उद्यान, से.३, कोपरखैरणे, चिंचोली उद्यान से-५ ऐेरोली, स्व.राजीव गांधी उद्यान, से.५ ऐरोली या उदयानांचा समावेश आहे.
- उद्यान विकसीत करणे, उद्यान सुधारणा करणे, खेळणी बसविणे व उद्यानांचे संवर्धन व संरक्षण या कामांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात रु.४९८० लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनेक औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत विश्वसनीय व दर्जेदार संस्थाना उद्याने/मैदाने/चौक सुशोभिकरण, संवर्धन व संरक्षणासाठी सहभागी करुन घेण्यात आले आहे.
- "हरित शहर, सुंदर शहर" हे प्रत्येक नागरी संस्थेचे ध्येय आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील तरतूदीनुसार नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाची १६ मे, २००१ रोजी स्थापन करण्यात आली असून उक्त अधिनियम व महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम, २००९ च्या कायद्यान्वये नवी मुंबई महानगरपालिका वृक्षाच्या जतनाचे काम करीत आहे. शहरात असलेली वृक्षसंपदा जतन करावी, अनधिकृतपणे झाडांची तोड प्रतिबंधित करावे व अधिक वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग कार्यरत आहे.
- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी सन २०१६-१७ च्या वृक्ष प्राधिकरणाच्या अंदाजपत्रकात रु.६७५.०० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. दिनांक ०१ जुलै २०१६ रोजी वन महोत्सव कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकाच दिवशी २०,००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
- नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी नागरिकांमधील वृक्षप्रेम वाढीस लागावे आणि विशेषत्वाने शालेय, महाविद्यालयीन मुंलांमध्ये लहान वयापासूनच वृक्षप्रेमाची गोडी वाढावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी "झाडे, फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन व उद्यान स्पर्धा" आयोजित करीत असते. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस नवी मुंबईतील सूज्ञ वृक्षप्रेमी, नागरिक यांचा सहभाग अपेक्षित आहे.
Last updated on : 18/02/2017 00:02