*1 ते 15 जुलै या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा*
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 15 जुलै 2022 या कालावधीत “अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थींना ओआरएस पाकीटांचे व झिंकचे वितरण करण्यात येत असून योग्य नियोजन करुन त्याचे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रनिहाय वितरण करण्यात आले आहे.
अतिसार हे 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्युचे प्रमूख कारण असून बालकांच्या मृत्यूमधील 7% मृत्यू हे अतिसारामुळे होतात. बालपणातील अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अतिसार नियंत्रण पंधरवडा हा उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पूर / नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे. अतिसार असलेल्या सर्व मुलांना ओआरएस व झिंकचे वाटप करणे व ते त्यांच्यापर्यंत पोहचेल याची सुनिश्चिती करणे तसेच 5 वर्षाखालील अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे / काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन करणे त्याचप्रमाणे अतिजोखमीचे क्षेत्रे व दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
अतिसार नियंत्रण पंधरवडा या मोहिमेचे व्यवस्थापन व अंमलबजावणी करण्यासाठी 11 जून रोजी महानगरपालिका स्तरावर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम. एल.एच.व्ही यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक या गोळया यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली, ओआरएस झिंक या गोळयांचे घरोघरी वाटप, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय स्तरावर झिंक कॉनर्र स्थापन करणे याविषयी प्रशिक्षणामध्ये सविस्तर चर्चा करुन योग्य नियोजन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. घरभेटीमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करुन प्रत्येक घरी ओआरएस पाकीट व ज्या बालकांना अतिसाराची लागण झालेली आहे अशा बालकांना ओआरएस पाकीट व 14 दिवस मुदतीसाठी झिंक गोळया तसेच 2 ते 6 महिने वयोगटातील बालकांना 10 मि.ली. ग्रॅम(अर्धी गोळी) व 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना 20 मिली ग्रॅम (1 गोळी) देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ओआरएसचे द्रावण तयार करुन पालकांना त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. अतिसार नियंत्रण पंधरवडा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
Published on : 03-07-2022 14:24:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update