कोपरखैरणे 1 ते 4 कन्टेनमेंट झोनमध्ये कोव्हीड-19 विषयक 500 हून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग
कोव्हीड - 19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोरोनाचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या विभागातील कंन्टेनमेंट झोनकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
या अनुषंगाने कोपरखैरणे विभागातील कन्टेनमेंट झोनमध्ये मागील 3 दिवसांपासून सातत्याने विविध सेक्टर व भागांमध्ये मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून आजही कोपरखैरणे सेक्टर 2 येथील महानगरपालिका शाळा क्र. 38 मध्ये कोपरखैरणे विभागात सेक्टर 1 ते 4 या कंन्टेनमेंट झोनमधील नागरिकांसाठी कोव्हीड-19 विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 517 नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली व कोरोना सदृष्य लक्षणे दिसणा-या 6 नागरिकांची स्वॅब टेस्टींग करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेसह डॉ. डि.वाय.पाटील रुग्णालय आणि तेरणा रुग्णालय यांच्या 10 डॉक्टरांचा समूह व महानगरपालिकेची स्वयंसेवक पथके या मास स्क्रिनींगमध्ये सहभागी असून याठिकाणी नागरिकांचे थर्मल स्कॅनींग करण्यात येत असून डॉक्टर संवाद साधत त्यांच्या प्रकृती संबंधी माहिती जाणून घेत आहेत व त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी त्वरीत तपासली जात असून त्यांच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे.
उद्याही कोपरखैरणे विभागात सेक्टर 19 कोपरखैरणेगांव या कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांची कोरोना विषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पुढील आठवड्यात तुर्भे विभागामध्ये कन्टेनमेंट क्षेत्रात कोव्हीड-19 विशेष वैद्यकीय तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
नवी मुंबई शहरातील कोरोनाची साखळी खंडीत कऱण्यासाठी विशेषत्वाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात सापडलेल्या कंन्टेनमेंट झोनमध्ये कोपरखैरणे व तुर्भे विभागात स्पेशल मास स्क्रिनींग कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनीही संसर्गातून पसरणारा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घरातच थांबावे आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 29-05-2020 16:06:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update