*11 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष चित्रकला स्पर्धा*
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त "जागर 2022" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दि. 30 मार्च ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त एक वैचारिक जागर करून आगळ्यावेगळ्या पध्दतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
या कालावधीत 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न होत असून त्याच्या पूर्वसंध्येला 10 एप्रिल रोजी सुप्रसिध्द साहित्यिक, विचारवंत हरी नरके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देणार आहेत.
तसेच 11 एप्रिल रोजी "विशेष चित्रकला स्पर्धा" आयोजित करून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.
दि. 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील स्वामी विवेकानंद उद्यान, सेक्टर 14, ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी व चित्रकारांसाठी या अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
इयत्ता 8 वी ते 12 हा एक गट तसेच त्यावरील खुला गट अशा 2 गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या गटासाठी -
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र
(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग
(3) बाबासाहेब आणि पुस्तक
आणि खुल्या गटासाठी -
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र
(2 बाबासाहेब आणि पुस्तक
(3) बाबासाहेब - ज्ञान हीच शक्ती (Knowledge is Power)
या तीनपैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्यासाठी 3 तासांचा कालावधी असणार आहे.
चित्र काढण्याकरिता लागणारा कागद, पेन्सिल, खोडरबर, पोस्टर कलर, कलर प्लेट, ब्रश आणि वॉटर कंटेनर हे साहित्य नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिले जाईल. या व्यतिरिक्त लागणारे इतर साहित्य स्पर्धकाने स्वत: आणावयाचे आहे.
खुल्या गटातील स्पर्धकाला चित्र काढण्यासाठी स्वत:चे माध्यम वापरता येईल. उदा. जलरंग, ॲक्रेलिक, क्रेयान, चारकोल, रंगित पेन्सिल, तैलरंग, स्केचपेन इ. परंतू चित्र काढण्यापूर्वी कागदावर संयोजकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक राहील. सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेच्या वेळेच्या अर्धा तास आधी म्हणजे सकाळी 7.30 वा. स्पर्धास्थळी येऊन आपल्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
सहभागी चित्रांमधून सर्वोत्कृष्ट चित्रांना अनुक्रमे रु. 10 हजार, रु. 7500/-, रु. 5 हजार व उत्तेजनार्थ अशी 4 पारितोषिके प्रत्येक गटामध्ये दिली जाणार आहेत. यामधील लक्षवेधी चित्रांचे प्रदर्शन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी स्मारकामध्ये भरविण्यात येणार आहे.
या विषयीच्या अधिक माहितीसाठी 9372106976 / 9702309054 / 9969008088 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
बाबासाहेबांची जयंती अत्यंत वेगळ्या स्वरुपात "जागर 2022" च्या रुपाने साजरी होत असून यामध्ये चित्रांच्या स्वरुपातून बाबासाहेबांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची चित्रकला स्पर्धेची संकल्पनाही अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी व्यक्तित्वाला चित्रांच्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-04-2022 09:26:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update