*12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज*
18 वर्षावरील नागरिकांच्या दोन्ही कोव्हीड डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका असून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही पहिला डोस 100 टक्के व दोन्ही डोस 76 टक्के इतके सर्वोत्तम प्रमाण नवी मुंबई महानगरपालिकेने राखलेले आहे.
यामध्ये आता उद्या 16 मार्चपासून लसीकरणाच्या सहाव्या टप्प्याला सुरूवात होत असून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे कोव्हीड लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेत याही टप्प्यावरील लसीकऱण गतीमानतेने व सुव्यवस्थितपणे करण्याचे नियोजन केले आहे.
12 ते 14 वयोगटातील लसीकरणासाठी 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेली मुले पात्र असणार असून त्यादृष्टीने जनजागृती व लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे. लसीकऱणासाठी येताना मुलांचे आधारकार्ड तसेच जन्म तारखेची नोंद असलेले शाळेचे आयकार्ड अथवा तत्सम कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात उद्या दि. 16 मार्च रोजी दुपारी 1 ते सायं 5 या वेळेत 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असून 17 मार्च पासून या तिन्ही रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याबाबतही बैठकीमध्ये आयुक्तांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच कोव्हीड लसीकरण नियंत्रक वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.
12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकऱण असल्याने आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी असे निर्देश आरोग्य विभागास देतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 12 ते 14 वयोगटातील आपल्या मुलाला कोव्हीड संरंक्षित करण्यासाठी पालकांनी लगेचच या तिन्ही महापालिका रुग्णालयांपैकी सोयीच्या रुग्णालयामध्ये आपल्या मुलाचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
Published on : 22-03-2022 05:49:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update