जानेवारी महिन्यातील 13 सेवानिवृत्त नमुंमपा कर्मचा-यांना शुभेच्छांसह निरोप
यशस्वी सेवानिवृत्ती ही प्रशंसनीय असून त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा देताना एकाच वेळी महानगरपालिकेचे अनुभवसंपन्न असे 13 कर्मचारी सेवानिवृत्त होणे हा एकप्रकारे महानगरपालिकेचा तोटा असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या नमुंमपा अधिकारी, कर्मचारी निरोप व शुभेच्छा समारंभानिमित्त त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त् डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाच्या उप आयुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अतिरिक्त् आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांनी सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील अविभाज्य भाग असून आता आरोग्याच्या विविध सोयी-सुविधांमुळे माणसाच्या आयुर्मानात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे असे सांगत सेवानिवृत्तीनंतरही आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहून खूप काही करता येते असा विश्वास व्यक्त केला.
जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त होणारे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रशांत गावडे, उप अभियंता श्री. शामराव शिरतोडे, स्वच्छता अधिकारी श्री. सुधीर पोटफोडे, शिक्षिका श्रीम. कुंदा कडू, अधिक्षक श्रीम. हेमलता म्हात्रे, आरोग्य पर्यवेक्षक श्री. प्रभाकर शेळके, आरोग्य सहाय्यक श्रीम. मालती अंधारे व श्रीम. उमा शिंदे, अग्निशमन प्रणेता श्री. कैलास वाघचौरे, लिपीक/ टंकलेखक श्री. सुर्यकांत कोळी, वाहनचालक श्री. रामप्रकाश यादव, सफाई कामगार श्री. चंद्रकांत काते व श्री. शंकर करोतिया या 13 अधिकारी, कर्मचारीवृंदाचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांचे कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
Published on : 19-03-2024 11:53:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update