मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने दि. 01 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरीक मतदार नोंदणीस पात्र असल्याचे जाहीर करत या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व कार्यवाहीस प्रारंभ झालेला आहे.
*या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये याकरिता दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021 तसेच दिनांक 27 व 28 नोव्हेंबर 2021 या शनिवार व रविवार अशा शासकीय सुट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.*
या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत या आधीपासून कार्यान्वित असलेल्या पदनिर्देशित नोंदणीच्या ठिकाणी म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये मतदार नोंदणी विषयक केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. येथे मतदार नोंदणीबाबत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असणार असून ते त्याच ठिकाणी स्विकारले जाणार आहेत.
उपलब्ध अर्जांमध्ये अर्ज नमुना-6 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना-7 नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना-8 नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना -8अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल.
आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी करण्याची ही महत्वाची संधी असून 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच यापूर्वी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे याबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे.
*तरी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई नागरिकांनी या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले नाव त्वरीत समाविष्ट करून घ्यावे व असलेले नाव तपासून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*