नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे सादरीकरण राष्ट्रीय कार्यशाळेत करण्याचा बहुमान

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वतीने दिल्ली येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन विषयक राष्ट्रीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी देशभरातून उपस्थित विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी-अधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांच्यासमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीविषयी विस्तृत माहिती देत प्रभावी सादरीकरण केले.
मागील दोन दशकांमध्ये झपाटयाने होत असलेल्या नागरिकीकरणामुळे शहरांमध्ये कार्यरत महानगरपालिका, नगरपालिका पुरवित असलेल्या पायाभूत सुविधांवर मोठया प्रमाणावर ताण येत असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्यातही घनकचरा व्यवस्थापनावर याचा प्रामुख्याने परिणाम होत असल्याचा दिसून येतो. याविषयी विविध शहरांत उपाययोजना केल्या जात आहेत मात्र त्यामध्ये अधिक कृतीशील बदलांची अपेक्षा असल्याचे लक्षात घेऊन नीती आयोगाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिका, कॉर्पोरेट संस्था, शास्त्रज्ञ, व्यावसायिक तसेच शासकीय, संशोधनात्मक व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन कार्याला योग्य दिशा मिळण्यासोबतच पर्यावरणविषयक लाभदायी कामही अपेक्षित धरण्यात आले होते.
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2018' मध्ये नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम क्रमांकाचे मानांकन संपादन करणारी महानगरपालिका असून घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार निर्माण होतो त्याच ठिकाणी ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणे, त्या कच-याची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळापर्यंत स्वतंत्र वाहतूक करणे, कचरा वाहतूक नियंत्रण व निरीक्षणासाठी आरएफआयडी सारखी अत्याधुनिक तंत्रप्रणाली वापरणे तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे आणि प्लास्टिकपासून ग्रॅन्यूल्स तयार करुन त्याचा उपयोग डांबरी रस्ते निर्मिती करताना रस्त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी कोटींगमध्ये करणे अशा अत्याधुनिक प्रकारे प्रक्रिया केली जात आहे. शिवाय उर्वरित घनकचऱ्याची शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली व प्रकल्प देशातील पर्यावरणशील उत्तम प्रणाली व प्रकल्प म्हणून नावाजला जात असून याबाबतचे सादरीकरण केंद्र सरकारच्या नीती आयोगाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत करायला मिळणे हा नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले आहे.
Published on : 12-02-2019 17:02:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update