दिव्यांगांना दिलासा देणारे इटीसी उपकेंद्राचे ऐरोलीत उद्घाटन
सर्व प्रकारच्या दिव्यांगांना इटीसी केंद्राच्या माध्यमातून एकाच छताखाली शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा देशपातळीवर नावलौकिक होत असताना इटीसी केंद्रात प्रतिक्षा यादीवर मोठ्या संख्येने असलेल्या दिव्यांग मुले, व्यक्ती व त्यांच्या पालकांचा विचार करून ऐरोली येथे इटीसीचे उपकेंद्र सुरू होत असल्याबद्दल अतिशय समाधान वाटते अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील इमारतीत सुरू करण्यात येत असेलल्या इटीसी अपंग शिक्षण केंद्राच्या उपकेंद्र उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांचेसमवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, स्थानिक नगरसेविका श्रीम. संगीता पाटील, नगरसेवक श्री. अनंत सुतार आणि इतर नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्री. संदीप नाईक यांनी शहरातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका जपत काम करीत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी केंद्राचा लाभ सात हजाराहून अधिक दिव्यांग व्यक्तींना मिळतो ही अतिशय चांगली गोष्ट असून नागरिकांची आवश्यकता लक्षात घेऊन ऐरोली येथे इटीसीचे उपकेंद्र सुरू करणे ही कौतुक करण्याजोगी बाब असल्याचे सांगितले. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना करीत इटीसी केंद्रातील महत्वाच्या फिजीओथेरपी उपकरणांसाठी 15 लक्ष आमदार निधी देत असल्याचे त्यांनी घोषित केले.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ऐरोली येथे सुरू होणा-या इटीसी उपकेंद्रामुळे या भागातील दिव्यांगांना वाशीपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही ही दिव्यांग व्यक्ती, मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी गोष्ट असल्याचे सांगितले. या भागाचा पाहणी दौरा करीत असताना नजरेस आलेल्या या विनावापर इमारतीचा कायापालट होऊन आता दिव्यांग कल्याणकारी कार्यासाठी अत्यंत चांगला वापर होत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी इटीसी केंद्रामार्फत अत्यंत उत्तम रितीने केल्या जात असलेल्या दिव्यांग सेवाभावी कार्याबद्दल केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
Published on : 05-03-2019 14:52:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update