महापालिका सर्वसाधारण सभेत गुणवंतांचा सन्मान

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, विविध क्षेत्रातील 7 गुणवंतांचा उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्ष प्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रतिनिधी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, भारतीय जनता पार्टी प्रतिनिधी नगरसेवक श्री. सुनिल पाटील, नगरसेविका ॲड. अपर्णा गवते यांच्या सन्माननीय उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यामध्ये 17 डिसेंबर 2018 रोजी ई.एस.आय.रूग्णालय, अंधेरी, मुंबई येथे लागलेल्या आगीत आपल्या प्राणाची पर्वा न करता दिघा, नवी मुंबई येथील रहिवाशी सिध्दरामेश्वर सिद्राम हुमनाबादे यांनी रूग्णालयातील 10 रूग्णांचे प्राण वाचविले. त्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करीत त्यांचा गौरव कऱण्यात आला.
त्याचप्रमाणे दि. 28 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधान महोदय यांचे उपस्थितीत झालेल्या एन.सी.सी.पंतप्रधान रॅलीमध्ये ऐरोली, नवी मुंबई येथील रहिवाशी अभिजित भैरवनाथ पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे एन.सी.सी. परेड कमांडर म्हणून सहभाग घेतला. नवी मुंबईचा नावलौकीक राष्ट्रीय पातळीवर उंचाविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यासोबतच केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या संघात नवी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये शिक्षण झालेली विद्यार्थिनी खेळाडू अश्विनी मोरे यांनी राष्ट्रीय विजेतेपद संपादन करणा-या महाराष्ट्र संघात लक्षणीय खेळ करीत विजयात महत्वाचा वाटा उचलल्याबद्दल तसेच याच संघाचे कर्णधारपद भूषविमारी दिक्षा सोनसुरकर व या संघात प्रतिनिधीत्व करणारी साक्षी तोरणे या खो-खो मधील उल्लेखनीय खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्त क्रीडा क्षेत्रात या मुलींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्त्री शक्तीचा विशेष उल्लेख करण्यात आला.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत 21 वर्षाखालील राष्ट्रीय विजेतपद संपादन करणा-या महाराष्ट्र राज्याच्या मुलांच्या संघात प्रतिनिधीत्व करून विजयात महत्वाचा वाटा उचलणारे खो-खो पट्टू संकेत कदम तसेच पाटना, बिहार येथे संपन्न झालेल्या तिसाव्या राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 72 कोपरखैरणे मध्ये शिक्षण घेणा-या व नवी मुंबई महानगपालिकेच्या कबड्डी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या राष्ट्रीय विजेते पद संपादन करणा-या महाराष्ट्र संघातील खेळाडू दिपक केवट यांचाही सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई शहराचा नावलौकीक उंचविण्यात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल 7 गुणवंतांचे महापालिका सभागृहाच्या वतीने अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
Published on : 08-03-2019 15:27:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update