आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने सविस्तर आढावा
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये प्राप्त स्वच्छ शहराचे देशातील सातव्या क्रमांकाचे मानांकन उंचावत पहिल्या तीन क्रमांकात येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सज्ज होत असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा संबंधित अधिका-यांसह सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, उद्यान विभागाचे उप आयुक्त श्री. नितिन काळे तसेच सर्व विभाग अधिकारी, अभियंते, स्वच्छता अधिकारी, उद्यान अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांनी स्वच्छता ही केवळ अभियानापुरती करण्याची गोष्ट नसून ती कायमस्वरूपी सवय व्हावी यादृष्टीने जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना करीत स्वच्छतेविषयक छोट्या छोट्या गोष्टींची सविस्तर माहिती घेतली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्व विभागात असलेल्या सार्वजनिक, सामुदायिक शौचालयांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने डागडुजी व दुरूस्ती करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कडेला लावलेल्या लिटर बिन्सची पाहणी करून त्यांचीही गरजेप्रमाणे त्वरित दुरूस्ती करणे व आवश्यक त्या ठिकाणी नव्याने लिटर बिन्स बसविण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने मुख्य चौकांमध्ये कारंजे, शिल्पाकृती बसविणे तसेच रस्त्यांच्या कडेला हिरवळ लावून हरित क्षेत्राचा विकास करणे त्याचप्रमाणे दुर्लक्षित पडीक जागांची सफाई करून त्यांना सुशोभित करणे अशा विविध बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याबाबत आयुक्तांनी आदेशित केले.
रस्त्यांमधील दुभाजकांची स्वच्छता आणि त्यांचेही सुशोभिकरण याविषयी विभागवार पाहणी करून त्यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा पुनर्वापर मोठ्या प्रमाणावर उद्याने, सुशोभित जागा फुलविण्यासाठी करण्यात यावा असेही आदेशित करण्यात आले.
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छता राखण्यासोबतच अस्वच्छताही होणार नाही यादृष्टीने नागरिकांची मनोभूमिका तयार करण्यावर भर देण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत असे सूचित करीत आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी अधिक जोमाने सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.
Published on : 16-12-2019 14:44:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update