नववर्षारंभदिनी साजरा होतोय नवी मुंबई महानगरपालिकेचा 28 वा वर्धापनदिन
देशातील निवासयोग्य शहरांमध्ये व्दितीय क्रमांकाने मानांकीत व 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये देशात सातव्या व राज्यात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकीत तसेच नागरिकांचा प्रतिसाद क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान संपादन केलेले शहर म्हणून नावाजले जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन दि. 1 जानेवारी 2020 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये साजरा होत आहे. यानिमित्त अधिकारी, कर्मचारीवृंद विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
दि. 1 जानेवारी 1992 रोजी स्थापना झालेली नवी मुंबई महानगरपालिका ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रुपांतरीत झालेले देशातील एक आगळेवेगळे उदाहरण आहे. स्थापनेपासूनच आपले वेगळेपण जपणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने अगदी प्रारंभापासूनच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या उल्लेखनीय व दूरगामी नियोजनबध्द प्रकल्प, कार्याची दखल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, सन्मानांनी वेळोवेळी घेण्यात आली आहे.
स्वत:च्या मोरबे धरण प्रकल्पामुळे लाभलेली जलसंपन्नता, शास्त्रोक्त भू भरणा पध्दतीवर आधारीत देशातील सर्वोत्तम पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी शुध्द करणारी पर्यावरणशील अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे, दरवर्षी पटसंख्येत लक्षणीय वाढ होत असलेले आणि नव्या माहिती तंत्र युगाला सामोरे जात 600 हून अधिक वर्गखोल्यांतून डिजीटल शिक्षण प्रणालीचा उपयोग करून राबविले जाणारे गुणवत्तापूर्ण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्हिजन, सीबीएससी बोर्डाच्या कार्यान्वित दोन शाळा, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील एकमेव इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र, वंडर्स पार्क - रॉक गार्डन - ज्वेल ऑफ नवी मुंबई - ॲम्युझमेंट पार्क – झेन गार्डन - दिव्यांगासाठीचे स्पेशल संवेदना उद्यान अशी 225 हून अधिक उद्याने व सुशोभित जागांची गार्डन सिटी, त्रिस्तरीय आरोग्य सेवा, स्मार्ट कार्ड आणि ॲपव्दारे प्रवाशांसाठी उपयोगी एन.एम.एम.टी. बस सेवा, पर्यावरण व आरोग्याची जपणूक करणारी युलू सायकल व ई बाईक सुविधा, शहर सुरक्षेला 4 केंद्रांतून प्राधान्य देणारी अग्निशमन सेवा. वास्तुरचनेचा देशातील उत्तम नमुना ठरणारी ग्रीन बिल्डींग गोल्ड मानांकीत मुख्यालय वास्तू व त्यापुढील प्रतिक चिन्ह स्वरुपातील विक्रमी राष्ट्रध्वजस्तंभ, महिला - बालके - मागासवर्गीय व्यक्ती - ज्येष्ठ नागरिक यांच्याकरीता 50 हून अधिक कल्याणकारी योजना राबविणारी अग्रणी महानगरपालिका, ई-गव्हर्नन्सव्दारे 30 प्रकारच्या नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारी व वेबसाईटसह nmmc e connect या मोबाईल ॲपवर कर भरणा व तक्रार निवारण प्रणाली सुविधा देणारी लोकाभिमुख महानगरपालिका अशा विविध प्रकल्प, लोकोपयोगी कामांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वतंत्र ठसा उमटलेला आहे.
अशा नवी मुंबई महानगरपालिकेच्या दि. 01 जानेवारी 2019 रोजी साज-या होणा-या वर्धापनदिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंद यांचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 10 वा. विष्णुदास भावे नाट्यगृहाचा नुतनीकरणोत्तर शुभारंभ महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. श्री. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ. श्री. रमेश पाटील, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ., स्थायी समिती सभापती श्री. नविन गवते, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले, आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका, समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आगामी सन 2020 या नववर्षानिमित्त तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त समस्त नवी मुंबईकर नागरिकांना शुभेच्छा देत असताना आगामी वर्षात होणा-या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे मानांकन कायम राखण्यासाठी व देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येण्यासाठी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने संपूर्ण व सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-01-2020 10:43:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update