महिला सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका अधिक जोमाने काम करणार
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे म्हणजेच ख-या अर्थाने महिला सक्षमीकरण होणे असल्याचे मत व्यक्त करीत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी महिलांमध्ये सावित्रीची क्षमता असल्याचे सांगत त्यांना प्रोत्साहन देणा-या जोतिबांची गरज असल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका महिलांसाठी चांगले काम करत असून यापुढील काळात समितीचा निधी वाढविण्यात येऊन अधिक उत्तम काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीदिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या विशेष समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, सभागृहनेता श्री. रविंद्र इथापे, कार्यक्रमाच्या विशेष अतिथी के.इ.एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर, जागतिक किर्तीच्या जलतरणपट्टू सागरकन्या श्रीम. रुपाली रेपाळे, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. श्रध्दा गवस व श्रीम. उषा भोईर, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती श्रीम. शशिकला पाटील, उद्यान समिती सभापती श्रीम. शशिकला सुतार, विधी समिती सभापती श्रीम. सायली शिंदे, नगरसेवक श्री. संजू वाडे, श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. शिल्पा कांबळी, श्रीम. अनिता मानवतकर, श्रीम. लता मढवी, श्रीम. सलुजा सुतार, श्रीम. पुजा मेढकर, श्रीम. संगीता बो-हाडे, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी महिलांमधील कॅन्सर निदानाकरिता उपक्रम राबविण्याचा चांगला निर्णय महानगरपालिकेने घेतला असून सुरूवातीपासूनच अशाप्रकारचे अभिनव उपक्रम राबविणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्री केंद्र असावे असे त्यांनी सांगितले.
महापौर श्री. जयवंत सुतार यांनी याप्रसंगी बोलताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना विकासाचा मंत्र दिला. त्यांच्या विषयीचा आदर व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिकाही महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमध्ये काळाची पावले ओळखून तशा प्रकारचे आधुनिक व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असून यापुढील काळात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाताना घराप्रमाणेच आपला परिसरही स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन 'माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे' या भावनेतून आपल्या नवी मुंबई शहराला तीन महिन्यांच्या सर्वेक्षण अहवालात मिळालेले देशातील तृतीय क्रमांकाचे नामांकन आणखी पुढे नेण्यासाठी आपण एकसंघ भावनेतून प्रयत्न करूया असे आवाहन महापौरांनी केले व सर्वांसह स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
के.इ.एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पातकर यांनी महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कल्पकता व विधायकता अधिक असते असे सांगत सातत्य, आत्मविश्वास व ध्येय या अंगभूत गुणांच्या आधाराने स्त्रियांनी आत्मिक अस्तित्व जोपासना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मानसशास्त्रीयदृष्ट्या महिलांच्या क्षमता विकासासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा असे सांगत यापुढील काळात महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे असे बोलण्याची वेळच येऊ नये अशाप्रकारे महिला विकास व्हायला हवा असेही त्या म्हणाल्या.
सात समुद्र पार करणा-या भारतातील पहिल्या आणि जगातील सर्वात लहान वयाच्या महिला असणा-या सागरकन्या श्रीम. रुपाली रेपाळे यांनी लहानपणापासूनच्या आपल्या जडणघडणीचा अनुभव कथन करीत आता प्रशिक्षक म्हणून नवी पिढी घडवित असताना पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षांबद्दल भाष्य करीत आपल्या मुलाच्या क्षमतेचे भान ठेवत झटपट निकालापेक्षा मुलाच्या सर्वांगीण विकासाला पुरेसा वेळ द्यायला हवा असे सांगितले.
समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी कामांची माहिती देत आगामी काळात राबविण्यात येणा-या उपक्रमांविषयी सांगितले.
महिला व बालकल्याण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या संस्थेस देण्यात येणारा 'क्रांतीज्योति सावित्राबाई फुले पुरस्कार' सीवूड नेरुळ येथील ‘’समता महिला मंडळ" या संस्थेस रक्कम रु. 25 हजार व मानपत्र आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात प्रदान करण्यात आला.
यावेळी महिलांकरिता आयोजित रांगोळी, मेहंदी, निबंध, नृत्य, गायन, नाट्य, पाककला, सॅलेड सजावट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगत आणली.
Published on : 03-01-2020 14:52:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update