स्वच्छता कार्याला आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या पाहणी दौ-यातून गती
'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या सक्रीय सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिका-यांसह सातत्याने विविध विभागांना भेटी देत बारकाईने पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वेक्षणाच्या सिटी प्रोफाईलमध्ये असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील स्वच्छताविषयक बाबींची आयुक्तांनी पाहणी करत मौलिक सूचना केल्या.
यामध्ये बेलापूर विभागातील आग्रोळी तलावाला भेट देऊन त्यांनी जलाशयाची स्वच्छता अधिक चांगली राहिल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. अशाचप्रकारे सर्व तलावांच्या स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. बेलापूर विभागातील विविध सेक्टर्सनां भेटी देत आयुक्तांनी दुर्लक्षित असलेल्या जागांच्या सुशोभिकरणावर भर देण्याच्या तसेच स्वच्छता अधिक चांगली करण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रमाबाई आंबेडकर नगर याठिकाणी कॉर्नरला असलेल्या मोकळ्या जागेत बैठक व्यवस्था व ओपन जीम करण्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे सेक्टर 6 येथील बस डेपोमध्ये बस थांब्यांवरील स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहिराती लावून नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी असे निर्देशित केले. विविध रस्त्यांवर असलेल्या लिटरबिन्स वरील ओला व सुका कचरा असे स्टिकर असण्याबाबत खात्री करण्याचे व नसलेल्या ठिकाणी ते तातडीने लावण्याचे सूचित करीत रस्त्यांवर गाड्या धुण्यामुळे अस्वच्छता होते हे बघता त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत ज्याठिकाणी बांधकाम सुरु आहे अशा स्थळी कामाचा फलक व ग्रीन नेट असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नेरुळ विभागात आर.आर. पाटील उद्यानामध्ये वॉटर फॉल रचना करून तसेच जाळ्यांवर वेलींचे आच्छादन करून सुशोभिकरणावर भर देण्याच्या सूचना आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या. सर्व उद्यानांमध्ये पाईप लाईनने पाणी देण्याऐवजी स्प्रिंकलरवर भर देण्याचे त्यांनी निर्देशित केले त्याचप्रमाणे सर्व उद्यानांमध्ये महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणा-या खतांचा सुयोग्य वापर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. सेक्टर 3, 9 नेरुळ येथील वाणिज्य क्षेत्राला भेट देऊन तेथील साफसफाईची त्यांनी पाहणी केली तसेच त्याठिकाणी लावलेले कारंजे व शहरात ठिकाठिकाणी लावलेली कारंजी नियमित सुरु राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. रस्त्यावरील खांब, झाडे यावरून टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वायर्स, केबल्स काढण्याच्या सूचनाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या.
वाशी विभागात विष्णुदास भावे नाट्यगृहासमोरील रस्त्यावरील दुभाजकात सुशोभित वृक्षरोपे लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विष्णुदास भावे नाट्यगृहातील नाटकांच्या जाहिरातींचे हाताने लिहिले जाणारे फलक अत्याधुनिक पध्दतीने मल्टीप्लेक्स थिएटरच्या धर्तीवर शहराच्या नावलौकीकाला साजेशा डिजीटल स्वरुपात करण्याचे त्यांनी सूचित केले. मिनी सिशोअर याठिकाणी असलेला सुर्यास्त बघण्याचा टॉवर पॉईंट हा शहराचे आकर्षण असल्याचे लक्षात घेऊन त्याची वेळ निश्चित करणे तसेच त्याची क्षमता किती याविषयी सूचना फलक लावण्यास त्यांनी सांगितले. सागर विहार सेक्टर 6 येथील चौकात आकर्षक कारंजे उभारण्याबाबत सूचना करीत मिनी सिशोअर याठिकाणी पदपथ, जॉगींग ट्रॅक, आसन व्यवस्था व साफसफाई यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मिनी सिशोअर ते कोपरखैरणे अशा सायकल ट्रॅक बाबत सर्वेक्षण करण्याचेही त्यांनी सूचित केले.
सेक्टर 17 वाशी येथील दुभाजकामध्ये झाडांना नियमित पाणी देता यावे याकरीता थोड्या थोड्या अंतरावर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्याचे बघून ही संकल्पना चांगली असल्याचे स्पष्ट करीत शहर नियमित हरीत रहावे याकरीता सर्व ठिकाणी अशाप्रकारचे नियोजन करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. या पाहणी दौ-यात ठिकठिकाणी सार्वजनिक, सामुदायिक शौचालयांचीही आयुक्तांनी पाहणी केली व मौलीक सूचना केल्या.
सकाळपासून सुरु झालेल्या या पाहणी दौ-यात रात्री 9 नंतर वाशी रेल्वे स्टेशनला भेट देऊन आयुक्तांनी तेथील स्वच्छता व अनुषांगीक सुविधांची पाहणी केली तसेच दुस-या दिवशी सकाळपासून संबंधित सिडकोचे कार्यकारी अभियंता व स्टेशन व्यवस्था पाहणारे व्हि.सी.आर.एल.चे प्रतिनिधी यांच्या समवेत रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅक, कॅफेटेरिया, पार्कींग एरिया व परिसर अशा सर्व क्षेत्राची बारकाईने पाहणी करून काही ठिकाणचे डेब्रीज उचलणे, स्टेशन परिसरात हिरव्यागार लॉनची लागवड करणे, स्वच्छता व सुशोभिकरण वाढविणे याविषयी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांनी रेल्वेलाईन ओलांडू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधितांना केल्या.
तुर्भे सानपाडा भागात पामबिच मार्गावरून सानपाड्याकडे जाताना मोराज सर्कल जवळ कॉर्नरला लॉन लावून परिसर सुशोभित करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच सिताराम मास्तर उद्यानातील अंतर्गत व बाह्य सुधारणांविषयी मौलीक सूचना केल्या.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ छोट्या छोट्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत असून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार शहर स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी अधिक सक्रीय झाले आहेत. नवी मुंबईचे स्वच्छ व सुंदर असे नवे रुप नव्या वर्षात दिसत असल्याचे अभिप्राय नागरिकांकडून मिळत असून नवी मुंबईच्या मानांकनात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग व सर्वोत्तम प्रतिक्रिया आणि प्रतिसाद लाभेल असा विश्वास आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 07-01-2020 15:20:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update