नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता क्रीडा व सांस्कृतिक विभाग आणि शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि. 17 व 18 जानेवारी 2020 मध्ये दोन दिवसीय महापालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे प्रथमच आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जास्तीत जास्त महापालिका शाळांमधून खेळले जाणारे खेळ अर्थात कबड्डी, खो-खो आणि क्रिकेट या खेळांचा समावेश आहे.
या स्पर्धा प्रथम 10 केंद्र स्तरांवर आयोजित करण्यात येऊन त्यामधील विजयी संघ अंतिम क्रीडा स्पर्धेसाठी पात्र होणार आहेत. या 10 केंद्र स्तरांवर 4500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला आहे. अनेक खेळाडूंनी खेळतांना त्यांच्यामधील अंगभूत क्रीडा गुणांचे अत्यंत सुरेख प्रदर्शन करून आपल्या सहकारी खेळाडूंसह शिक्षकांचीदेखील मने जिंकली. यामधून विजयी होणारे संघ अंतिम महापालिका क्षेत्र स्तरावर दि. 22 व 23 जानेवारी 2020 रोजी भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3 ए, सी.बी.डी. बेलापूर येथील मैदानावर खेळणार आहेत.
मागील अनेक वर्षापासून खंडीत झालेल्या स्पर्धा यावर्षी पुन्हा आयोजित करण्याकरिता शिक्षणाधिकारी तथा उपआयुक्त श्री. नितिन काळे यांनी विशेष प्रयत्न केले. नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी त्यास मान्यता दिली. त्यामुळे यावर्षी इतर खाजगी शाळांप्रमाणेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आपले क्रीडागुण प्रदर्शित करण्याकरिता केंद्र स्तरावर संधी उपलब्ध झाली. या स्पर्धांमधून चमकदार कामगिरी करणा-या तसेच उत्तम शारीरिक क्षमता असणा-या मात्र खेळाचे कमी ज्ञान असलेल्या खेळाडूंना हेरुन यापुढील काळात विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आखण्याचा मनोदय आहे. या स्पर्धा आयोजनाकरीता क्रीडा विभागातील क्रीडा अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र समन्वयक यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे.
Published on : 18-01-2020 10:26:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update