करोना विषाणूबाबत जाहीर आवाहन
दि. 31 डिसेंबर 2019 पासून चीन देशामध्ये हुबेई प्रांतातील वुहान शहरात न्युमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून या न्युमोनियाचे कारण नव्या प्रकारचा करोना विषाणू (Novel Corona Virus 2019-nCov) असल्याचे सिध्द झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून येणा-या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरु केले आहे. अशा प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा व त्याच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांमार्फत (आयडीएसपी) करण्यात येत आहे.
साध्यासुध्या सर्दी खोकल्यापासून ते सर्व किंवा सार्स सारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणा-या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास 'करोना विषाणू' असे म्हणतात. सन 2003 साली आढळलेला (SARC) सार्स हा देखील एक प्रकारचा करोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा करोना विषाणूच आहे. तथापि त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास 'नॉव्हेल कोरोना विषाणू' असे नाव देण्यात आले आहे.
सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड), तीव्र ताप ही करोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा येणे अशी काहीशी गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे तसेच न्युमोनिआ, पचनसंस्थेची अतिसारासारखी लक्षणे, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे तसेच प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये (Typical) लक्षणे आढळू शकतात.
या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे या वाटे हवेमार्फत (Droplets) या विषाणूंचा प्रसार होत असावा असा अंदाज आहे. या विषाणूकरीता कोणतीही लस अथवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. करोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो याबद्दल सध्या निश्चित माहिती नाही.
या विषाणूचा उद्भव कसा झाला आणि प्रसार कसा होतो, हे निश्चितपणे माहित नसल्याने या संदर्भात ठराविक स्वरूपाची प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी यावर भाष्य करणे कठीण असले तरीही सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरुप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामध्ये, श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस न खाणे, फळे व भाज्या न धुता खाणे टाळणे, खोकताना वा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल/टिश्यु पेपरचा वापर करणे व अशाप्रकारे वापरलेले टिश्यु पेपर ताबडतोब व्यवस्थित झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकणे अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
करोना बाधित देश, प्रांतामधून येणा-या सर्व प्रवाशांकरीता सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर स्क्रिनिंग सुरु आहे. तरी वरील लक्षणे आढळून आल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कळविण्यात यावे. या बाबतची तपासणी नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 29-01-2020 12:18:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update