महापालिका कर्मचा-यांना दोन दिवसीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण
कोणतीही आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे कायम दक्षता राखण्याची गरज असून नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने जागरूक आहे. म्हणूनच यशदा सारख्या नामांकित संस्थेच्या माध्यमातून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेंद्र पाटील यांनी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष अधिक सक्षम करण्यात येत असल्याची माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने यशदा, पुणे यांच्या सहयोगाने आयोजित महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता आपत्ती व्यवस्थापन संबंधीची कार्यप्रणाली या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, प्रशिक्षणाचे व्याख्याते यशदा, पुणे यांच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक कर्नल श्री. विश्वास सुपनेकर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद आपत्ती व्यवस्थापनाविषयी माहितीसंपन्न असावा यादृष्टीने प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांच्यामार्फत त्यांच्या विभागातील इतर कर्मचारीवृंदाला त्याची माहिती मिळेल असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले.
यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र संचालक कर्नल श्री. विश्वास सुपनेकर यांनी शुभारंभप्रसंगी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने बोलताना आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा विषय पण इतर अनेक विषयांमध्ये व्यस्त असल्यामुळे या विषयाकडे काहीसे दुर्लक्ष होते असे सांगितले. आपत्ती छोटी असो वा मोठी त्यामध्ये सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न असणे व त्या प्रयत्नांमध्ये परस्पर समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या दोन दिवसीय प्रशिक्षणातून नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Published on : 06-02-2020 11:30:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update