सायन पनवेल महामार्गानजिक स्वामी विवेकानंदांच्या विचार फलकासोबत आकर्षक सेल्फी पॉईंट
सेल्फी पॉईंटवर चेह-याचा फोटो काढण्यासोबत याठिकाणी प्रदर्शित केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनोपयोगी विचारांचा फोटो मनात काढून ठेवावा अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी हा सेल्फी पॉईंट नवी मुंबईच्या दक्षिण प्रवेशव्दारानजीक असल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 6 येथे अग्निशमन केंद्रासमोर सायन पनवेल हायवेनजीक मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा समितीचे सभापती तथा स्थानिक नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. अशोक गुरखे व श्रीम. सरोज पाटील, माजी नगरसेविका श्रीम. शैला नाथ, बेलापूर विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या स्मार्टफोन युगात सेल्फी काढण्याचे विलक्षण आकर्षण केवळ तरूणांमध्येच नाही तर सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये दिसून येते. त्यामुळे हा परिसर अधिक सुंदर दिसावा यादृष्टीने हा आकर्षक सेल्फी पॉईंट बनविण्यात आला असून स्वच्छ शहराचे मानांकन लाभलेल्या नवी मुंबई शहराच्या आकर्षकतेमध्ये यामुळे भर पडल्याचा आनंद स्थानिक नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी व्यक्त केला.
या सेल्फी पॉईंटमध्ये हिरवळीवर भिंत उभारून त्यामध्ये आयकॉनीक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. त्याशेजारी दुस-या भिंतीवर स्वामी विवेकानंद नगर ही आकर्षक अक्षरे लावण्यात आली असून त्याखाली स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत लावण्यात आले आहेत. सायन पनवेल महामार्गालगत मोक्याच्या जागी असलेला हा सेल्फी पॉईंट सहजच लक्ष वेधून घेतो. विशेषत्वाने सायंकाळी रंगीबेरंगी प्रकाश योजनेमुळे हा सेल्फी पॉईंट अतिशय उठावदार दिसतो. येथील प्रतिकृती आणि विचारांच्या फलकांसोबत छायाचित्र काढण्याचा मोह अनेकांना आवरता येणार नाही अशाप्रकारे या सेल्फी पॉईंटची रचना करण्यात आली आहे.
Published on : 13-02-2020 11:24:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update