पुण्याचा महेंद्र चव्हाण ‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी सनिष यादव याने पटकाविला ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ चा बहुमान
नवी मुंबईमध्ये विविध खेळांतील प्राविण्यप्राप्त खेळाडू असून शहरात क्रीडा संस्कृती रूजविण्याचे काम महापौर चषकांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन तसेच क्रीडा प्रशिक्षण यामधून केले जात असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी येथील शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच युवकांमध्ये व्यायामाची आवड रूजविण्यासाठी 1996 पासून सातत्याने राज्यस्तरीय व महापालिकास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. या स्पर्धेला प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून या स्पर्धेप्रमाणेच नवी मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनेने स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी स्पर्धा आयोजन करून नवनवे उत्तम शरीरसौष्ठवपटू घडविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे महापौरांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ आणि ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेनिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
227 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण या शरीरसौष्ठवपटूने 1 लक्ष 25 हजार पारितोषिक रक्कमेसह पटकाविला. राज्यस्तरीय उपविजेतेपद मुंबईच्या सुशील मुरकर याने 45 हजार रक्कमेसह पटकाविले.
‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा मानकरी ठरणा-या सनिश यादव यास 50 हजार रक्कमेची पारितोषिक रक्कम स्मृतिचिन्हासह प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील उपविजेतेपद सागर मोरे याने संपादन केले.
पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत आपटे, सरचिटणीस ॲड. विक्रम रोठे, खजिनदार श्री. शरद मारणे, मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव श्री. राजेश सावंत, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जी.एस.पाटील व सचिव श्री. हेमंत खेबडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौर महोदयांसमवेत उपस्थित राहून महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार श्री. संजीव नाईक, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनीही शुभेच्छा दिल्या.
‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ स्पर्धेमध्ये पुण्याच्या महेंद्र चव्हाण या 85 किलोवरील वजनी गटातील विजेत्याने सुशिल मुरकर (मुंबई), राजू भडाळे (पुणे), सनिश यादव (नवी मुंबई), तौसिस मोमीन (पुणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), नितीन म्हात्रे (ठाणे), ओंकार आंबेकर (मुंबई उपनगर) अशा सर्व सातही वजनी गटातील विजेत्यांवर मात करीत नवी मुंबई महापौर श्री किताब पटकाविला. मुंबईचा सुशील मुरकर याने उपविजेतेपदाचा बहुमान संपादन केला. मुंबई उपनगरचा अभिषेक खेडकर ‘बेस्ट पोझर’ तसेच नवी मुंबईचा सनिश यादव हा प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू’ पारितोषिकाचा मानकरी ठरला.
‘नवी मुंबई महानगरपालिका श्रेत्र श्री’ स्पर्धेमध्ये सनिश यादव हा महानगरपालिका क्षेत्र श्री किताबाचा मानकरी ठरला. सागर मोरे यास उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला.
राज्यस्तरीय स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील असे आठ वजनी गट होते. या सर्व गटातील सहा विजेत्यांना पारितेषिक रक्कमेसह प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली. अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो तसेच 70 किलोवरील 75 किलो वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून 227 शरीरसौष्ठवपट्टू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
Published on : 19-02-2020 11:44:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update