नवी मुंबई महानगरपालिका खो खो संघ नवी मुंबई महापौर चषक पुरूष गटाचा राज्यस्तरीय मानकरी रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे खो खो संघाने पटकाविला महिला गटाचा नवी मुंबई महापौर जिल्हास्तरीय चषक

नवी मुंबईतून गुणवंत खेळाडू घडविणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महापौर चषकांतर्गत विविध स्पर्धांच्या आयोजनातून, उत्तम क्रीडा प्रशिक्षण देऊन, खेळांच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देत महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून यावर्षी खो खो, कबड्डी व शुटिंगबॉल खेळांचे व्यावसायिक संघ निर्माण केले आहेत. त्या संघांची राज्य स्तरावर ठिकठिकाणी जोरदार कामगिरी होत असल्याचे समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी आजची महापौर चषक निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धाही मध्य रेल्वे सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करीत नवी मुंबई महानगरपालिका संघाने जिंकली याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणात 27 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक पाचव्या निमंत्रीत राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासमवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. लता मढवी, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे, महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनच्या सह सचिव श्रीम. गंधाली पालांडे, मुंबई खो - खो असोसिएशनचे सचिव श्री. सुरेंद्र विश्वकर्मी, स्पर्धा निरीक्षक श्री. राजन देवरुखकर व श्री. किशोर पाटील, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव श्री. सुरेश नाईक, रा.फ.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. थळे, पंच प्रमुख श्री. विरेंद्र भुवड, श्री. मयुर पालांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने बलाढ्य मानल्या जाणा-या मध्य रेल्वेच्या संघावर 1 डाव 7 गुणांनी मात करीत 51 हजार रक्कमेसह राज्यस्तरीय महापौर चषक पटकाविला. मध्य रेल्वेच्या संघाला उपविजेतेपदाचा चषक 31 हजार रक्कमेसह प्रदान करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संघ 20 हजार रक्कमेच्या तृतीय क्रमांकाचा तसेच पश्चिम रेल्वेचा संघ 15 हजार रक्कमेसह चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.
जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणेच्या संघाने शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर या नामांकीत संघाला 4 गुणांनी पराभूत करीत महिलांचा जिल्हास्तरीय महापौर चषक 21 हजार रक्कमेसह स्विकारला. शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर संघाला रू. 15 रक्कमेचे पारितोषिक व उपविजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचे शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर, राबाडे हे तृतीय क्रमांकाच्या 10 हजार पारितोषिक रक्कमेचे व ग्रिफीन जिमखाना कोपरखैरणे चतुर्थ क्रमांकाच्या 5 हजार रक्कमेचे मानकरी ठरले.
राज्यस्तरीय पुरूष गटात नवी मुंबई महानगरपालिका संघाचा गजानन शेंगाळ हा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा तर संकेत कदम हा सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून वैयक्तिक पारितोषिक विजेता ठरला. मध्य रेल्वेच्या विजय हजार यांस सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
जिल्हास्तरीय महिला गटात रा.फ.नाईक संघाची खेळाडू पौर्णिमा सकपाळ सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तर मृणाल कांबळे ही सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून वैयक्तिक पारितोषिकाची मानकरी ठरली. शिवभक्त विद्यामंदिरची प्रियांका भोपी सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू म्हणून सन्मानित झाली.
या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, साईकृष्ण इलेक्ट्रीक, महाराष्ट्र महावितरण कंपनी व मध्य रेल्वे असे आठ बलाढ्य संघ सहभागी झाले होते.
अशाचप्रकारे जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय, राजर्षी शाहू महाराज नमुंमपा विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय, विहंग अॅकॅडमी, शिवभक्त विद्यामंदीर, ग्रिफीन जिमखाना, नमुंमपा शाळा क्र. 41 व फादर अॅग्नेल हे आठ नामांकित संघ सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय पुरूष गटात नवी मुंबई महानगरपालिकेचा संकेत कदम 27 फेब्रुवारीच्या तसेच मध्य रेल्वेचा मिलींद चावरेकर 28 फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.
जिल्हास्तरीय महिला गटात नमुंमपा शाळा क्र. 41 आडवली भूतावलीची संस्कृती पाटील ही 27 फेब्रुवारीच्या तसेच नमुंमपा राजर्षी शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर राबाडेची अश्विनी मोरे ही 28 फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
यावेळी मध्य रेल्वेचा आणि भारतीय खो-खो संघाचा कर्णधार श्री. योगेश मोरे याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनबध्द स्पर्धा आयोजनाची प्रशंसा करीत पारितोषिकांच्या दृष्टीनेही खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही सर्वोच्च स्पर्धा असल्याचे सांगितले.
3 दिवस चालणा-या या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय स्तर गाजविणा-या अनेक नामांकित पुरुष व महिला खो-खो पट्टूंचा समावेश असल्याने अंतिम लढतीसह तिन्ही दिवस क्रीडा रसिकांनी क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूस उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहात खो-खो सारख्या अत्यंत चपळ अशा खेळाचा आनंद लुटला.
Published on : 02-03-2020 05:59:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update