नवी मुंबई महापौर चषक गायन व नृत्य स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याचा जल्लोष
नवी मुंबई शहरातील नव्या पिढीच्या अंगभूत कौशल्याला वाव देण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रमांचे आयोजन करीत असून या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबईतील कलावंत विविध चित्रवाहिन्यांवरील रियालिटी शो मधून चमकतील असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याच्या शुभारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयु्क्त श्री. नितिन काळे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, सुप्रसिध्द संगीतकार चिनार, महेश आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महापौर चषक स्पर्धा जाहीर केल्यानंतर प्रवेशिका भरण्यासाठी उदयोन्मुख कलावंतांची एकच झुंबड उडाली. गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी 104 तसेच नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी 127 प्रवेशिका दाखल झाल्या. त्यामध्ये गायन स्पर्धेत वैयक्तिक गायनाकरीता लहान गटात 20 आणि मोठ्या गटात 44 प्रवेशिका दाखल झाल्या. समुह गायनात लहान गटामध्ये 6 व मोठ्या गटामध्ये 14 प्रवेशिका दाखल झाल्या. वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात 43 व मोठ्या गटात 43 प्रवेशिका त्याचप्रमाणे समुह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात 21 व मोठ्या गटात 26 प्रवेशिका दाखल झाल्या. या व्यतिरिक्त 80 ते 90 कलावंतांना मर्यादेमुळे प्रवेश देणे शक्य झाले नाही. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती व स्पर्धा निमंत्रक डॉ. जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.
संपूर्ण दिवसभर चालणा-या या महाअंतिम सोहळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ अंतिम फेरीसाठी निवडलेल्या 24 गायनाच्या व 24 नृत्याच्या सादरीकरणानंतर संपन्न होणार असून याप्रसंगी कलावंतांचे कौतुक करण्यासाठी सुप्रसिध्द अभिनेत्री हेमांगी कवी उपस्थित राहणार आहेत.
Published on : 03-03-2020 12:58:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update