जागतिक महिला दिनानिमित्त भावे नाट्यगृहात स्त्री शक्तीचा उत्साही जल्लोष
नवी मुंबई महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकडे सुरूवातीपासूनच विशेष लक्ष देत असून यापुढील काळात महिलानी उत्पादित केलेल्या वस्तूंना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागवार केंद्रे सुरू करून ठोस प्रयत्न केले जातील असे सांगत महापौर श्री. जयवंत सुतार यांनी 'नारीशक्तीचा विजय असो' अशी घोषणा दिल्यावर त्यांच्यासह हाऊसफुल्ल भरलेल्या सभागृहातील महिलांनी उत्स्फुर्तपणे जयघोष केला. जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात महापौर आपले मनोगत व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर महापौर महोदयांनी स्वत: सत्कार न स्विकारता हा स्त्रियांच्या मातृत्वाला, कर्तृत्वाला व नेतृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे असे म्हणत उपमहापौरांसह व्यासपीठावरील सर्व नगरसेविका, अधिकारी यांचा सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इतर महिला कल्याणकारी योजनांप्रमाणेच यावर्षी 111 प्रभागांत महिलांची कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे काम केल्याचे सांगत यापुढे जात औषधोपचारासाठीही मदत करण्याची भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, कार्यक्रमाच्या निमंत्रक महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. संगिता पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर व श्रीम. रंजना सोनवणे, आरोग्य समिती सभापती श्रीम. शशिकला पाटील, उद्यान समिती सभापती श्रीम. शशिकला सुतार, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. कमलताई पाटील, श्रीम. अनिता पाटील, श्रीम. सलुजा सुतार, श्रीम. संगिता बो-हाडे, श्रीम. सुवर्णा पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील, माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांनी नवी मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याचा निर्वाळा देत महिलांना योग्य सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबईच्या देशभरातील मानांकनात महिलांनी स्वच्छताविषयक केलेल्या कामगिरीचा मोठा वाटा असल्याचे सांगत यापुढील काळात कच-याचे वर्गीकरण व पाणीबचत या महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याचे उपमहापौरांनी आवाहन केले.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नाट्यगृहाच्या आवारात महिला उद्योजिकांनी प्रदर्शित केलेल्या विविध वस्तु विक्रीच्या 250 हून अधिक स्टॉल्सना भेटी देत आपल्या मनोगतात घर, संसार सांभाळत छोट्या मोठ्या वस्तु उत्पादनातून कुटूंबाला आर्थिक हातभार लावत स्वाभिमान जपणा-या महिलांचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम, योजनांच्या माध्यमातून महिलांना समर्थ बनविण्यासाठी अधिक चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी दिला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. संगिता पाटील यांनी समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या महिला व बाल कल्याणकारी विविध कामांची माहिती देत आजच्या विशेष कार्यक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त करीत स्वागत केले.
याप्रसंगी सीवूड बेलापूर येथील डाएट फूड असलेल्या रोस्टेड ग्रेन्सच्या उद्योजिका श्रीम. सुरेखा जाधव तसेच महिला उद्योजक बनविण्यासाठी सेवाभावी काम करणा-या श्रीम. शुभांगी तिरोडकर यांना महिला उद्योजकता पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
स्वच्छता अभियानात सक्रीय योगदान देणा-या संस्थेस देण्यात येणारा स्वच्छता विशेष पुरस्कार आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेस रू. 21 हजार व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र स्वरूपात महापौर महोदयांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट महिला पोलीस पुरस्कार श्रीम. स्नेहल जगदाळे यांना, दिव्यांगांकरिता उत्तम काम करणा-या महिला पुरस्कार श्रीम. परिमिता मुजुमदार यांना, आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीम. रूतिका संखे यांना, विनावेतन कार्य करणारी समाजसेविका पुरस्कार श्रीम. मानसी धनावडे यांना रू. 5 हजार आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वरूपात प्रदान करण्यात आला.
या सोबतच महानगरपालिकेच्या बेलापूर ते दिघा अशा आठ विभागांतील आठ उत्कृष्ट महिला सफाई कामगार आणि आठ उत्कृष्ट आशा वर्कर यांनाही सन्मानीत करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक वेशभूषा, महिला भजन मंडळ गायन, वक्तृत्व, समुह गायन, समुह नृत्य, समुहनाटिका व हास्य सम्राज्ञी स्पर्धांतील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिकांसह स्मृतीचिन्हांनी गौरविण्यात आले.
नगरेसविकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या नगरसेविका श्रीम. वैशाली नाईक आणि उपविजेत्या श्रीम. प्रज्ञा भोईर यांचाही पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. पैठणीच्या लकी ड्रॉ मधील 3 भाग्यवंत महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आल्या.
यावेळी महानगरपालिका शाळा क्र. 35, कोपरखैरणे मध्ये इयत्ता तिसरीत शिकणा-या कु. ऋतुजा पोपट पाटील हिने स्त्री भ्रूण हत्या विषयावर सादर केलेल्या स्वगताने उपस्थितांची मने जिंकून घेतली. तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये प्रेक्षागृह शेवटपर्यंत हाऊसफुल्ल भरलेले होते. महिलांच्या एकापेक्षा एक सरस अशा कलाविष्कारातून ओसंडून वाहणा-या उत्साहात हा जागतिक महिला दिन नवी मुंबईतील महिलांनी सर्वार्थाने जल्लोषात साजरा केला.
Published on : 09-03-2020 05:45:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update