ज्येष्ठ नागरिक दिनाचा समारंभ उत्साहात साजरा
ज्येष्ठ नागरिक हे अनुभवांचा आणि विचारांचा खजिना आहे ही भूमिका नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी आदरभाव व आपुलकी जपत काम करीत असून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासारखी अभिनव संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी यापुढील काळात आबा आहे तर घराची शोभा आहे या आगरी म्हणी नुसार ज्येष्ठांसाठी अधिक उत्तम काम करण्याचा निश्चय व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील साहित्यमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष समारंभानिमित्त महापौर आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील, महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य तथा अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. डी.एम. चापके तसेच स्वतंत्र कक्षाचे सदस्य श्री. भ.र शेजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य श्री. डि.एम.चापके यांनी नवी मुंबई महानगरपालिका ही ज्येष्ठांचा सन्मान करणारी देशातील अग्रणी महानगरपालिका असल्याचे गौरवोद्गार काढले. सरकारचे ज्येष्ठ नागरिक धोरण येण्याआधीपासून नवी मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून स्वतंत्र कक्ष स्थापन केला तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासारखी दिलासा देणारी योजना प्रभावीपणे राबविली याबद्दल समाधान व्यक्त केले. 1 ऑक्टोबरला नियोजित ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम तांत्रिक बाबींमुळे आयोजित करता आला नसला तरी महानगरपालिकेने न विसरता या समारंभाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले याबद्दल त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी प्रौढांच्या ॲथलॅटिक्स स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर 94 पदके संपादन करणा-या श्री. उत्तम अण्णा माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील वयाची 75 वर्षे पूर्ण करणा-या 142 ज्येष्ठ नागरिकांना तसेच विवाहाची 50 वर्षे पूर्ण करणा-या 22 ज्येष्ठ नागरिक दांपत्यांना सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कॅरम, बुध्दिबळ, गायन, काव्यवाचन, वेशभुषा, कथाकथन, अभिनय, निबंध, ब्रीज असा विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणा-या या विविध स्पर्धांप्रमाणेच तीन महिन्यातून एकदा ज्येष्ठ नागरिकांना कलाविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणारे महापालिका स्तरीय कार्यक्रम आयोजित करावेत या श्री.डि.एम.चापके यांच्या सूचनेला महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिक दिनाचा हा सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाप्रमाणेच संगीतमय मैफिलीने सजला.
Published on : 11-03-2020 16:38:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update