महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक आदेश
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" ची अंमलबजावणी सुरु झाली असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी उपाययोजना करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ हे सक्षम प्राधिकारी आहेत.
या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी विशेष आदेश जारी करीत महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयातील विलगीकरण कक्ष तसेच सेक्टर 14 बहुउद्देशीय इमारतीमधील अलगीकरण कक्ष याठिकाणी अत्यावश्यक वाहने वगळता वाहनांच्या वाहतुकीला प्रतिबंध जारी केला आहे.
त्याचप्रमाणे करोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळणाघरे, अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस, ग्रंथालये / अभ्यासिका, सिनेमागृहे, नाटयगृहे, मॉल्स, जलतरण तलाव, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, मसाज सेंटर, जीम, क्लब, पब्स, डान्स बार, पार्क, गार्डन, सभागृहे, मंगल कार्यालये, बॅक्वेंट हॉल्स, क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे बंद राहतील त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा असे विविध कार्यक्रमही होणार नाहीत असे जाहीर केले आहे. याशिवाय फेरीवाल्यांकडून रस्ते, पदपथांवर विक्री होणारे खाद्यपदार्थ, ज्युस यावरही पूर्णत: बंदी आणण्यात आली आहे. यामध्ये रेस्टॉरंट, कॅफे आणि इटरीज् यांनी त्यांच्या ग्राहक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश द्यावा व प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 3 फूट अंतर राहील व त्यांच्या वापरासाठी सॅनिटायझर असण्याची दक्षता घ्यावयाची आहे.
यासोबतच सर्व दुकाने, वाणिज्य विषयक बाबी, खाजगी व कॉर्पोरेट समुह / कार्यालये, उत्पादन व निर्मिती विषयक उद्योग समुह हे देखील पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. यामधून - पिण्याचे पाणी पुरवठा करणारे पुरवठादार, सांडपाणी आणि स्वच्छताविषयक सेवा, बँकींग स्रव्हिसेस आणि बँक कार्यालये (केवळ अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी असावेत), इन्शुरन्स कंपनी व त्यांचे कार्यालय (केवळ अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी असावेत), दूरध्वनी व इंटरनेट सेवा व त्यांचे कार्यालय (केवळ अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी असावेत), खाद्यपदार्थ, अन्नधान्य, दूध, फळे, भाजीपाला या जीवनावश्यक गोष्टींची दुकाने व वाहतुक करणारी वाहने आणि गोडाऊन. स्विगी, झोमाटो सारखी ऑनलाईन अन्नपदार्थ घरपोच डिलीव्हरी करणारी सेवा, रूग्णालये, मेडिकल / केमिस्ट दुकाने आणि त्यांची गोडाऊन्स,, मेडिकल इक्विपमेंट उद्योग, फार्मासिटिकल आणि त्यांचे फॉर्म्युलेशन करणारे उद्यागे व त्यांची वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल पंप, ऑईल एजन्सी व त्यांचे गोडाऊन्स आणि त्यांची वाहतुक व्यवस्था, मेडिकल व नर्सिंग महाविद्यालये, वरील बाबींशी संबंधित डाटा सेंटर व आयटी सर्व्हिसेस (एकूण कर्मचारी क्षमतेच्या 10 टक्के अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी यांचेकडून कामे करून घेणे), प्रसारमाध्यमे, सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारी प्रोडक्शन / मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स (एकूण कर्मचारी क्षमतेच्या 10 टक्के अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी यांचेकडून कामे करून घेणे) तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) संबंधित सेवा, बॉम्बे स्टॉक एक्सेंज, नॅशनल स्टॉक एक्सेंज, युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर, एम्बसी, कॉन्सुलेट इ. यांना (एकूण कर्मचारी क्षमतेच्या 25 टक्के अत्यावश्यक सेवेकरिता कर्मचारी यांचेकडून कामे करून घेणे) या बंदमधून सूचित केलेल्या अटींसह नागरिकांची गरज म्हणून सेवा कार्यान्वित ठेवण्यास सवलत देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील मिनी सी शोअर वाशी, सागर विहार, जॉगिंग ट्रॅक अशा सर्वच विभागातील मोकळ्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये अशा नागरिकांना सूचना देण्याचे निर्देश संबंधित विभागांचे सहा. आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांस देण्यात आलेले आहेत.
शहरातील तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टप-या बंद करण्यात आल्या असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने रू. 250/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्याची कार्यवाही स्वच्छता अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभाग यांनी काटेकोरपणे करावी असे निर्देशित करण्यात आले आहे.
नागरिकांच्याच आरोग्य हितासाठी हे निर्णय घेण्यात आले असून त्याचे पालन सर्व नागरिकांनी काटेकोरपणे करून सहकार्य करावे व कोरोना विषाणूविरूध्दच्या या सामुहिक लढाईत गर्दीमध्ये सहभागी न होता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता एकटेपणा राखून सहयोग द्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-03-2020 07:32:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update