दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक मेळाव्यासंबंधीत व्यक्तींची व कोव्हीड-19 रूग्णांची माहिती कळविणेबाबत जाहीर प्रकटन
मार्च 2020 महिन्यामध्ये दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी जमातीच्या धार्मिक मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील 250 हून अधिक नागरिक सहभाग झाले होते. या समुहातील 24 जणांना कोव्हीड-19 ची बाधा झाल्याचे शासन स्तरावर स्पष्ट झाले असून त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचे मा.आरोग्य संचालक, महाराष्ट्र शासन यांच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे.
या धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या धर्मगुरूंनी त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्रसह तेलंगणा, झारखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये या धार्मिक मेळाव्यासंबंधातील व्यक्ती कोव्हीड-19 बाधीत झाल्याचे आढळले आहे.
या पार्श्वभूमीवर सदर धार्मिक मेळाव्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आलेल्या ज्या व्यक्ती सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आहेत किंवा बाधीत आढळण्याची शक्यता आहे, त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अनुषंगाने नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या व्यक्ती या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होत्या, त्यांनी स्वत:हून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड-19 नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कळवावे, जेणेकरून कोव्हीड-19 चा प्रसार रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यक्तीकडे याबाबत कोणत्याही तपशील उपलब्ध असल्यास तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षास विनाविलंब कळवावा. या प्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णत: गुप्त ठेवण्यात येईल.
कोव्हीड-19 नियंत्रण कक्ष - टोल फ्री क्रमांक :- 1800222309 / 1800222310
कोव्हीड-19 नियंत्रण कक्ष - हेल्पलाईन क्रमांक :- 022-27567060 / 022-27567061
सदर नियंत्रण कक्षात प्राप्त होणाऱ्या माहितीबाबत संबंधीत परिमंडळाचे महापालिका उपआयुक्त यांनी संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत अशा व्यक्तीचा शोध घ्यावा. याकरिता त्यांच्या स्तरावरून विविध माध्यमांचा (Sources of Information) वापर करावा. एखादी व्यक्ती माहिती लपवत आहे, याविषयी खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी संयुक्त कार्यवाही करावी.
अशाप्रकारची माहिती न देणारी व्यक्ती, सदर कार्यक्रमात सहभाग झालेल्या व्यक्तीला दडवून ठेवणारी व्यक्ती अथवा माहिती दडवून साथरोग नियंत्रण कामात अडचण निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करून संबंधित व्यक्तीस ताब्यात घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
Published on : 13-04-2020 08:44:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update