आधुनिक बूम स्प्रेयर वाहनाव्दारे कोरोना हॉटस्पॉट्सचे प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये आरोग्य आणि स्वच्छता या परस्पर पुरक बाबी असल्याचे लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाईकडे विशेष लक्ष देत तसेच क्वारंटाईन केंद्रे व घरे याठिकाणचा बायोमेडीकल कचरा स्वतंत्रपणे सुरक्षितरित्या संकलित करण्याकडे काळजीपुर्वक लक्ष देण्यात येत आहे.
या सोबतच वर्दळीच्या ठिकाणांवर अत्याधुनिक जेटींग मशीनव्दारे सोडियम हायपोक्लोराईड सारखे जंतुनाशक फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे तसेच गावगावठाण व झोपडपट्टी भागातही खांद्यावर अडकविण्याच्या मशिनव्दारे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.
यामध्ये आता स्वाध्याय परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागास देण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा 5 अत्याधुनिक बूम स्प्रेयर शक्तीमान वाहनांमधील 1 वाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात फवारणी करण्यासाठी देण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो अशा परिसरात तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येते. त्याठिकाणी तसेच इतर हॉटस्पॉटवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी या अत्याधुनिक वाहनाचा उपयोग होणार आहे.
या अत्याधुनिक वाहनाव्दारे एकाच वेळी 23 फुट रुंदीच्या पट्ट्याचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असून वाहनाच्या पुढील भागात असणारे ॲडजेस्टेबल हॅन्ड्स ॲटोमॅटीक दुमडले जाऊन छोटे रस्ते व गल्ल्यांमध्येही या वाहनाच्या माध्यमातून फवारणी केली जाऊ शकते. 600 लिटर सोडियम हायपोक्लोराईड हे जंतुनाशक साठवण क्षमता असून या संपूर्ण यंत्रणेची व फवारणी पध्दतीची पाहणी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिका-यांसमवेत केली.
स्वाध्याय परिवाराच्या दिदी धनश्री तळवलकर यांनी ही ट्रॅक्टर स्वरुपातील 5 अत्याधुनिक बूम स्प्रेयर शक्तीमान वाहने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला दिलेली असून या आधुनिक वाहनामुळे कमी कालावधीत व मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुलभ होत आहे.
Published on : 20-04-2020 07:04:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update