आंतरराष्ट्रीय योग दिनापासून कोरोनाबाधितांच्या मनोशारीरिक क्षमतावृध्दीसाठी योग उपक्रम
नवी मुंबई महानगरपालिकने वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर याठिकाणी उभारलेल्या १२०० बेड्स क्षमतेच्या सीसीसी व डिसीएचसी कोव्हीड १९ रूग्णालयात उपचारासाठी दाखल कोरोना बाधितांचे मनोबल व शारीरिक क्षमता वाढावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार 'योग व प्राणायाम' उपक्रम राबविण्यात येत असून आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 'आर्ट ऑफ लिव्हिंग' वाशी शाखेच्या माध्यमातून त्याची सुरुवात करण्यात आली. यापुढे दररोज सकाळी अर्धा तास याठिकाणी दाखल कोरोना बाधितांकडून योग व प्राणायाम करून घेतले जाणार आहेत..
मानसिक व शारीरिक क्षमता वृध्दीसाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण असून कोरोना बाधितांच्या मनावरील मानसिक तणाव दूर व्हावा आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊन पर्यायाने रोगप्रतिकारशक्ती वृध्दींगत व्हावी या भूमिकेतून हा अत्यंत उपयोगी असा योगविषयक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये वाशी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे योगा व हॅप्पीनेस प्रशिक्षक श्री. प्रमोद कोकणे व श्री. मयुरेश आसुडेकर स्वयंस्फुर्तीने पुढे आले असून सामाजिक बाधिलकी जपत आपल्या सहका-यांसमवेत योग व प्राणायाम करून घेणार आहेत तसेच ताणतणाव विरहित आनंदी जगण्याची सूत्रे सांगणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमधील या कोव्हीड 19 रूग्णालयात सध्या 103 कोरोनाबाधित उपचारार्थ दाखल असून योगक्रियेमुळे सकारात्मक विचार व मानसिक उमेद वाढत असल्याचे अभिप्राय येथील कोरोनाबाधित व्यक्तींकडून व्यक्त केले जात आहेत.
Published on : 22-06-2020 11:54:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update