कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळणाऱ्यांकडून 7 लक्ष 92 हजार दंड वसूल स्वत:च्या व इतरांच्या आरोग्य संरक्षणासाठी काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन करणे, नियमित हात धुणे हा प्रभावी उपाय आहे. तथापि काही नागरिक या गोष्टींचे गांभीर्य लक्षात न घेता या सामाजिक नियमांचे पालन करीत नसल्याने ते त्यांच्या स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला हानी पोहचविणारे कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात. त्यामुळे अशी काहीशी बेजबाबदार वर्तणुक करणाऱ्या नागरिकांना याविषयाचे गांभीर्य कळावे याकरीता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपल्या वर्तनाने अडथळे आणणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याचे आदेश निर्गमित केले होते.
त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक प्रभावी कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे अशा प्रकारचे कोरोना प्रसारासाठी पूरक बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांकडून 7 लक्ष 92 हजार 750 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये बेलापूर विभाग कार्यालयाने 2 लक्ष 19 हजार, नेरुळ विभाग कार्यालयाने 39 हजार, वाशी विभाग कार्यालयाने 56 हजार 500, तुर्भे विभाग कार्यालयाने 2 लक्ष 2 हजार 250, कोपरखैरणे विभाग कार्यालयाने 93 हजार 400, घणसोली विभाग कार्यालयाने 31 हजार 400, ऐरोली विभाग कार्यालयाने 1 लक्ष 38 हजार 900 व दिघा विभाग कार्यालयाने 12 हजार 300 अशा प्रकारे आठही विभाग कार्यालयांमार्फत एकूण 7 लक्ष 92 हजार 750 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क / रूमाल न वापरणे याकरिता रू. 500/- इतकी दंडात्मक रक्कम, रस्ते / बाजार / रूग्णालय / कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणे याकरिता रू. 1000/- इतकी दंडात्मक रक्कम, सर्व दुकानदार / फळे / भाजीपाला विक्रेते / सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्याठिकाणी खरेदीसाठी जाणारे ग्राहक यांनी दोन ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग) न राखल्यास ग्राहक / व्यक्ती यांचेकडून रू. 200/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग) राखले जाण्यासाठी आस्थापना मालक / दुकानदार / विक्रेता यांनी दुकानांसमोर मार्कींग करून घ्यायचे आहे व ग्राहकांना त्याचे पालन करण्यास सांगायचे आहे. ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले न गेल्यास अशा आस्थापना मालक/ दुकानदार/ विक्रेत्यांकडून रू. 2000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. हा दंड पहिल्यांदा आढळल्यास असणार असून अशा प्रकारचा नियमभंग दुस-यांदा केलेला आढळल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही अशी कारवाई करण्यात येईल असे आदेशान्वये यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे व मास्कचा कायम वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सामजिक अंतर राखण्याचे भान ठेवावे आणि सातत्याने साबणाने हात धुवावेत. आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी व नियम तोडून दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
3 जुलै रोजी मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून 13 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे व कोरोनाची साखळी खंडित करावी. लॉकडाऊनचे बंधन हे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य हितासाठी आहेत याची नोंद घेऊन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-07-2020 15:10:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update