समन्वय अधिकाऱ्यांना लॉकडाऊन स्थितीचा नियमित आढावा घेण्याचे आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांचे निर्देश
कोव्हीड-19 वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 3 जुलै 2020 रोजी, रात्री 12.00 वाजल्यापासून, 13 जुलै 2020 रोजी, रात्री 12.00 वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून आरोग्य विषयक सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी आपल्या घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करावी असे आवाहन करण्यात आले असून पोलीस विभागाच्या सहकार्याने त्यावर लक्ष दिले जात आहे.
याबाबत महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावून आठही विभागांकरीता नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांना दिवसातून एकदा आपापल्या विभागात फेरी मारुन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची बारकाईने पाहणी करण्याचे निर्देश दिले. यामध्ये संबंधित विभागांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या समवेत संयुक्त् पाहणी करावी व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.
डिपार्टमेंटल स्टोअर्सना केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीची परवानगी
रुग्णालयीन सुविधांमध्ये डेंटल क्लिनिक राहणार बंद
डि-मार्ट, रिलायन्स फ्रेश, मोअर, बिग बझार सारख्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये आवश्यक बाबींसाठी नागरिकांची गर्दी होऊन लॉकडाऊनचा हेतू खंडित होत असल्यामुळे ती बंद ठेवून होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यास परवानगी असेल असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयीन सुविधांमध्ये दातांचे दवाखाने (Dental Clinic) बंद राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील उदयाने, पार्क, गार्डन, ओपन जीम आणि सर्व सोसायटयांच्या आवारातील व्यायाम शाळा, जीम, तरणतलाव पूर्णपणे बंद असतील असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी आपल्या घरातच थांबून संसर्गातून पसरणारा कोरोनाचा विषाणू घराबाहेरच थोपवावा व कोरोनाचा वाढता प्रसार रोखावा असे आवाहन महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Published on : 06-07-2020 14:03:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update