कोरोना बाधिताच्या संपर्कातील 28 पर्यंत व्यक्ती शोधातून व तपासणीतून कोरोना नियंत्रणाला गती
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असताना आता केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढविली असून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा तत्परतेने शोध घेऊन (Contact Tracing) त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याची पध्दत प्रभावीपणे राबविली जात असल्याचे सांगत महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त् केला आहे.
केंद्र सरकारच्या यादीत नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर्स हा भाग रेड झोन म्हणून प्रदर्शित झाल्यानंतर या भागाकडे विशेष लक्ष देत येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील जास्तीत व्यक्ती शोधून (Contact Tracing) त्यांची आरोग्य तपासणी व त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत असल्यास विलगीकरण व उपचार ही पध्दत प्रभावी रितीने राबविण्यात आली. यामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 24 व्यक्तींचा शोध घेतला गेला. यामुळे या भागातील कोरोना बाधितांच्या वाढीवर 15 दिवसांत पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. कोरोना मुक्तीची ही पध्दत "तुर्भे पॅटर्न" म्हणून नावाजली गेली.
महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करत सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वैदयकीय अधिकाऱ्यांशी वेब मिटींगव्दारे सतत संवाद साधत कोरोना बाधित रुग्ण् सापडल्यावर त्याच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्य् स्थितीची माहिती घेणे व आवश्यकतेनुसार तपासणी आणि विलगीकरण करण्याचे निर्देश दिले. यावर निरीक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी विभागवार विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली.
यामुळे व्यक्ती शोध मोहिम (Contact Tracing) कामात नियोजनबध्दता आली व त्यातून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचा शोध कार्यात गतीमानता आली. साधारणत: 72 तासात अशा प्रकारे कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध (Contact Tracing) घेतला जावा अशा प्रकारे शासन पातळीवरील सूचना असतानाही महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या गोष्टीचे महत्व् ओळखून हे काम अधिक जलद करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. कारण जितक्या लवकर कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लक्षणे आढळलेल्या व्यक्ती सापडतील व त्यांच्यावर उपचार सुरु होतील तितक्या लवकर कोरोनाची साखळी खंडित होईल.
महापालिका आयुक्त् यांच्या निर्देशानुसार कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोध (Contact Tracing) या गोष्टीचे महत्व ओळखून सर्व नागरी आरोग्य केंद्रे याबाबत तत्परतेने कामाला लागली. त्यामुळे कोरोना बाधित सापडल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत विविध माध्यमांव्दारे महानगरपालिकेचे कर्मचारी पोहचत आहेत. सदयस्थितीत एका कोरोनाबाधित व्यक्तीमागे त्याच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे (Contact Tracing) प्रमाण 28 व्यक्ती इतके वाढले आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रसारावर प्रभावी रितीने नियंत्रण राखले जात आहे.
3 जुलैला संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी 29 जून पासून ज्या भागात त्यापूर्वी 15 दिवस आधी मोठया संख्येने कोरोनाबाधित सापडले होते अशा 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रात 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत त्या 12 क्षेत्रात घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग मोहिम राबविण्यात आली व 1 लाखाहून अधिक नागरिकांची कोव्हीड-19 विषयक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामधील संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण देखील करण्यात येत आहे. ही मास स्क्रिनींग मोहिम यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबधित मोठया संख्येने आढळत असलेल्या इतर भागातही राबविण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेणे, रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींपर्यांत पोहचणे (Contact Tracing) व त्यांचे जलद विलगीकरकण करणे आणि त्यांना योग्य उपचार देणे अशा सूत्रबध्द रितीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधावर भर देत असून त्यामधून कोरोना रुग्ण् संख्या नियंत्रित राखण्याला यश येताना दिसत आहे.
Published on : 08-07-2020 14:57:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update