बनावट कागदपत्रांच्या आधारे वाशीत बेकायदेशीर वृक्षतोड करणा-याविरोधात एफ.आय.आर. दाखल
सेक्टर 8 वाशीमध्ये भूखंड क्र. 130 व 131, सागर विहार मार्गालगत असलेल्या भंडारी व्हिला समोरील पदपथालगतची दोन झाडे बनावट परवानगी पत्र दाखवून बेकायदेशीररित्या तोडणा-या बाजीराव काळे या व्यक्तीविरोधात उद्यान विभागामार्फत वाशी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्यात आलेला आहे.
रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास सेक्टर 8 येथे भंडारी व्हिला समोरील पदपथालगत असलेली 2 झाडे तोडली जात असल्याचे दिसल्याने महानगरपालिकेच्या कचरागाडीवरील चालकाने त्यांच्याकडे विचारणा केली असता बाजीराव काळे या व्यक्तीने महानगरपालिकेचे परवानगीपत्र त्यांस दाखविले. सदर परवानगी पत्राचे छायाचित्र काढून चालकाने व्ह़ॉट्सॲपव्दारे उद्यानातील माळी यांच्यामार्फत उद्यान सहाय्यक आणि उद्यान अधिक्षक यांच्याकडे पाठविले. तपासणीअंती सदर जावक क्रमांक नमुंमपा/व.प्रा./टे.क्र.5/5551/2019, दि. 07/11/2019 रोजीचे पत्र भंडारी व्हिला, सेक्टर 8, वाशी यांना दिलेलेच नसून सेक्टर 19, नेरूळ येथील कटेज लँड सोसा. यांना देण्यात आल्याचे निदर्शनास आले.
अशाप्रकारे महानगरपालिकेचे बनावट पत्र तयार करून बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेत उद्यान / वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21(1) अन्वये बेकायदेशीर वृक्षतोड करणे प्रकरणी तसेच या वृक्षतोडीसाठी महानगरपालिकेचे बनावट पत्र तयार केल्याप्रकरणी बाजीराव काळे यांच्याविरोधात फसवणुकीचा व खोटे कागदपत्र तयार केल्याचा एफ.आय.आर. वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
Published on : 19-08-2020 10:33:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update