कोव्हीड कॉल सेंटरविषयी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा रविवारी फेसबुक लाईव्ह 'जनसंवाद'
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रेस, टेस्ट व ट्रिट या त्रिसूत्रीव्दारे 'मिशन ब्रेक द चेन हाती घेण्यात आले असून मृत्यूदर कमी करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. या कामाला गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून ते इतर कॉल सेंटरपेक्षा सर्वार्थाने वेगळे आहे.
या कॉल सेंटरमधून घरीच विलगीकरण (Home Isolation) करून आहेत असे कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी अथवा हृदयविकार अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) असणा-या व्यक्ती तसेच कोव्हीडवर मात करून बरे होऊन घरी परतलेले नागरिक अशा 5 हजाराहून अधिक व्यक्तींशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला जाणार असून त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती जाणून घेतली जात आहे. त्यांना वैद्यकीय सल्ला अथवा मदत हवी असल्यास त्वरित उपलब्ध करून दिली जात आहे.
या अभिनव कॉल सेंटर संकल्पनेविषयी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी, सायं. 6 वा. फेसबुक लाईव्ह व्दारे जनसंवाद साधणार आहेत. या जनसंवादात https:/www.facebook.com/NMMConline या फेसबुक लिंकव्दारे कोणत्याही नागरिकास सहजपणे सहभागी होता येईल.
तरी कोव्हीड़ कॉल सेंटरच्या या अभिनव संकल्पनेविषयी जाणून घेण्यासाठी रविवारी सायं. 6 वा. या फेसबुक लाईव्ह जनसंवादात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 08-10-2020 20:27:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update