कोरोना रूग्णांच्या प्रमाणात घट तरी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे काटेकोर लक्ष दिले जात असल्याचे परिणाम सातत्याने दिसून येत असून ऑक्टोबर महिन्यातील कोव्हीड सांख्यिकी तपशील पाहता नव्याने कोरोनाबाधित होणा-या व्यक्तींपेक्षा कोरोनातून बरे होणा-या व्यक्तींची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसत आहे. 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान 4710 कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झालेली असून 5208 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 14 जुलै रोजी बरे होऊन घरी जाणा-या कोरोनाबाधितांचा दर 61 टक्के होता तो आता 90 टक्क्यांपर्यंत पोहचलेला आहे. यासोबतच मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याने 14 जुलै रोजी 3.12 टक्के असणारा मृत्यूदर आता 2.01 टक्के इतका कमी झालेला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार 14 जुलै रोजी स्विकारल्यानंतर श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' च्या अनुषंगाने 'रूग्णशोध, तपासणी, उपचार (Tracing, Testiong, Treatment)' या त्रिसूत्रीवर दिलेला भर तसेच दररोज होणा-या मृत्यूबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवाद साधून करण्यात येत असलेले 'डेथ ऑडिट' याची यामध्ये महत्वाची भूमिका आहे.
कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेत त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येत असून त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार रोखण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. त्यासाठी टेस्टींग वाढीवर भर दिला जात आहे. सध्या 22 अँटिजेन टेस्टींग केंद्रांप्रमाणेच ए.पी.एम.सी. व एम.आय.डी.सी. सारख्या कोरोना प्रसारासाठी जोखमीच्या क्षेत्रातही विशेष टेस्टींग केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. त्याठिकाणी अँटिजेन व आरटी-पीसीआर दोन्ही प्रकारच्या टेस्ट्स करण्यात येत आहेत. नेरूळ रूग्णालयात प्रतिदिन 1000 टेस्ट क्षमतेची महानगरपालिकेची स्वत:ची अत्याधुनिक आरटी- पीसीआर लॅब कार्यान्वित केल्याने अहवाल जलद प्राप्त होऊन कोरोनाची साखळी वाढू न देण्यासाठी मोलाची मदत होत आहे. शिवाय 32 टेस्टींग मोबाईल व्हॅनही कार्यान्वित आहेत.
14 जुलै रोजी 26731 टेस्ट्सची संख्या 15 ऑक्टोबरपर्यंत केवळ 3 महिन्यात 2,42,289 टेस्ट इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ऑक्टोबर महिन्यातही पहिल्या 15 दिवसात 44484 टेस्ट करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच दिवसाला सरासरी 3000 टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 4710 पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून टेस्ट्सच्या तुलनेत कोरोना बाधितांचे प्रमाण 10.58 टक्के इतके कमी झालेले आहे.
विशेष म्हणजे मृत्यूदर कमी करणे व पॉझिटिव्ह रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवणे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देतानाच शहरातील उपचार घेत असणा-या ॲक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण समतोल राहील याकडेही आयुक्तांनी बारकाईने लक्ष दिलेले दिसून येते. 14 जुलै रोजी 3535 रूग्ण उपचार घेत होते, त्या ॲक्टिव्ह रूग्णांच्या प्रमाणात वाढीची कोणतीही लाट येऊ न देता समतोलपणा राखत ही रूग्णसंख्या कमी करण्यावरच विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सातत्याने भर देण्यात आला. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले. त्याचीच परिणिती म्हणजे ॲक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण आता 3000 च्या आसपास येण्याइतके कमी झालेले आहे. कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासोबतच योग्य उपचारसुविधा उपलब्ध करून देण्याकडेही तितकेच काळजीपूर्वक लक्ष दिले जात असून सध्या 6073 बेड्सची उपलब्धता आहे.
नवी मुंबई शहरातील कोव्हीडचे प्रमाण सध्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी नवी मुंबई महानगरपालिका याबाबत सदैव दक्ष आहे. आजही आयुक्तांसह सर्व अधिकारी तितक्याच सतर्कतेने काम करीत आहेत. सध्या 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत टप्प्याटप्प्याने खुले केले जात असलेले निर्बंध तसेच नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव, याकाळात संपर्क वाढीतून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कायम सावधगिरी हाच कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे हे नागरिकांनी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मास्कचा नियमित वापर हीच कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्याची ढाल आहे. त्यासोबतच नियमित हात धुणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे या उत्सव काळात व नेहमीच नागरिकांनी बचावाच्या या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे आणि आपल्याला व आपल्यापासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 18-10-2020 15:50:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update