मास्क वापराचे महत्व पटवून देण्यासाठी 'मास्क नाही तर प्रवेश नाही' अभिनव मोहीम

नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे चांगले सहकार्य यामुळे कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी होत असल्याचे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीवरून दिसून येत आहे. तथापि कोव्हीड 19 वर अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध झालेली नसल्याने मास्कचा नियमित वापर हाच सध्यातरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
त्यामुळे मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्वाची आहे. म्हणूनच कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचे महत्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क नाही तर प्रवेश नाही (NO MASK - NO ENTRY) मोहीम प्रभावी रितीने राबविण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांमध्ये या मोहीमेचा शुभारंभ एकाच वेळी करण्यात आला. नेरूळ विभागातील शुभारंभप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्यासह युनिसेफच्या प्रतिनिधी श्रीम. देविका देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या मोहीमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मास्क वापराचे महत्व पटवून देणे तसेच कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा, मास्कचा वापर कशा पध्दतीने करावा तसेच त्याची विल्हेवाट कशा रितीने लावावी याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मोहीमेच्या शुभारंभदिनी प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी 1000 पुनर्वापर करण्यायोग्य कापडी मास्कचे (Reusable Cloth Mask) वितरण नागरिकांना करण्यात आले तसेच पुनर्वापर पध्दतीची माहिती देण्यात आली.
या मोहीमे अंतर्गत मास्क नाही तर प्रवेश नाही - या बोधवाक्याचे प्रसारण मुख्य रस्त्यांवरील मोठे होर्डींग, वर्दळीच्या ठिकाणी लाकडी होर्डींग, एन.एम.एम.टी. बस पॅनल, दुकानांठिकाणी पोस्टर्स तसेच ध्वनीचित्रफित व ध्वनीक्षेपकाव्दारे प्रसारित केले जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
मास्क नाही तर प्रवेश नाही (NO MASK - NO ENTRY) ही मोहीम नागरिकांना त्यांचे आरोग्यहित पटवून देण्यासाठी असून कोणत्याही कार्यालयात, बस-रिक्षा-टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीमध्ये, दुकानांमध्ये मास्क परिधान केलेला नसेल तर प्रवेश न दिल्यास नागरिकांना मास्कचे महत्व समजेल तसेच अशा मास्क न घातलेल्या व्यक्तीमुळे इतरांना होणारा संसर्गाचा धोकाही टळेल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्क वापराचे महत्व ओळखून स्वत:तर मास्क वापरावाच शिवाय इतरांनाही मास्क वापरण्याचे महत्व सांगून मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 11-11-2020 14:23:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update