जागतिक शौचालय दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून शेल्टर असोसिएट्स, युनिसेफ यांच्या सहयोगाने ऐरोली विभागामधील सर्व सार्वजनिक शौचालयांचे काळजीवाहक यांच्यासोबत वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी काम करताना घ्यावयाची काळजी तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते.
कोरोना प्रसार प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करताना महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयाच्या नियमित स्वच्छतेकडे व निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष दिले होते. या काळात आपली दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता कर्मचारीवर्गाने उत्तमरित्या पार पाडली आहे. आगामी काळात कोरोनाची दूसरी लाट येण्याची शक्यता असून कर्मचारी वर्गाची जबाबदारी अधिक वाढली आहे. यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन महत्वाचे होते.
या अनुषंगाने कार्यशाळेत सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रत्यक्ष काम करताना कर्मचा-यांना येणा-या अडचणी जाणून घेण्यात आल्या, तसेच त्यावरील उपायांची माहिती देण्यात आली. सफाई काम करीत असताना या कर्मचा-यांनी आपली काळजी घ्यावी यादृष्टीने युनिसेफच्या सहकार्याने शेल्टर असोसिएट्स मार्फत सुरक्षा साहित्य कीट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबसाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. मंगला माळवे, स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष मसे, सर्व स्वच्छता निरीक्षक, शेल्टर असोसिएट्सच्या प्रकल्प व्यवस्थापक श्रीम, धनश्री गुरव, सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल गाडे, श्रीम. सुनीता सकुंडे, श्रीम. मिनाक्षी आढाव उपस्थित होते. याप्रसंगी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.
Published on : 20-11-2020 14:09:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update