आ.मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून आता ठिकठिकाणी पोहचणारी आरोग्य तपासणी रूग्णवाहिका
कोव्हीडची दुसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याच आरोग्य रक्षणासाठी मास्क नियमित वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे या सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे गंभीरपणे पालन करणे महत्वाचे आहे. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 'मिशन ब्रेक द चेन - 2' हाती घेण्यात आले आहे.
यामध्ये जलद रूग्णशोधावर भर देत कोरोनाची साखळी खंडीत करणे महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्या माध्यमातून, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून व एच.डी.एफ.सी. बँकेच्या सी.एस.आर. निधीतून मोबाईल आरोग्य वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभिनव सुविधेचे लोकार्पण महापालिका मुख्यालयासमोर आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोव्हीडच्या दुस-या लाटेचा धोका आता जाणवत असताना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट ओढवलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ही आरोग्य तपासणी रूग्णवाहिका अतिशय दिलासा देणारी आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी अशा प्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचे सांगितले. ही रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह सुसज्ज असणार असून ठिकठिकाणी जाऊन सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री कार्यालय, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री. देवेन्द्र फडणवीस. एच.डी.एफ.सी. बँक आणि या रूग्णवाहिकेमार्फत आरोग्य सेवा पुरविणा-या महानगरपालिकेचे आभार मानले.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या लढ्यात शासन व महापालिका प्रशासनाला कॉर्पोरेट तसेच बँकींग क्षेत्रानेही आपापल्या परीने सहकार्याचा हात दिला असल्याचे सांगत या आरोग्य तपासणी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून विशेषत्वाने सहव्याधी असणा-या कोमॉर्बिड व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देता येईल असे सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने ही रूग्णवाहिका पूर्ण क्षमतेने वापरली जाईल व तिचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोव्हीड 19 च्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून दररोजच्या टेस्टींग वाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये या आरोग्य तपासणी रूग्णवाहिकेची भर पडलेली असून याव्दारे नवी मुंबईकरांसाठी आरोग्य तपासणीचे विभागाविभागात पोहचणारे साधन उपलब्ध होत आहे.
Published on : 25-11-2020 15:08:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update