स्वच्छतेमध्ये देशात पहिल्या क्रमांकासाठी संपूर्ण क्षमतेने काम करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशात तिस-या क्रमांकाचा बहुमान संपादन केल्यानंतर यावर्षी देशात पहिल्या क्रमांकाचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम करायचे असून त्याकरिता स्वच्छता व सुशोभिकरणाच्या प्रत्येक बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विभागाविभागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करावे असे निर्देश दिले.
'स्वच्छ सर्वेक्षण 2021' च्या अनुषंगाने स्वच्छता विषयक कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचेसह सर्व नोडल ऑफिसर, विभाग प्रमुख, कार्य.अभियंता, विभाग अधिकारी, स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची विशेष बैठक घेऊन करावयाच्या कामाची दिशा स्पष्ट केली.
स्वच्छतेचे देशात तिसरे मानांकन प्राप्त केल्यानंतर केवळ ते टिकविणे नव्हे तर त्यामध्ये भर घालीत ते वाढविण्याची आपली जबाबदारी देखील वाढते हे लक्षात घेऊन प्रत्येकाने अधिक उमेदीने काम करावे. कोव्हीडच्या कालावधीत अनेक बाबींकडे विशेष लक्ष देता आले नाही. त्यातही आपण शहर स्वच्छता नियमित ठेवली असली तरी त्यामध्ये विशेष सुधारणा कोव्हीड नियंत्रणाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याने करता आली नाही. मात्र आता कोव्हीडचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसत असून स्वच्छतेसारख्या महत्वाच्या गोष्टीकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
त्या अनुषंगाने कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त असलेले आपले शहर सेव्हन स्टार मानांकीत व्हावे याकरिता विशेष प्रयत्न करावेत असे आयुक्तांनी सांगितले. याकरिता संबंधित सर्व घटकांनी आपापल्या भागात स्वच्छतेच्या दृष्टीने जागरुकतेने पाहणी करावी व सध्याच्या स्थितीत कशा आणि कोणत्या सुधारणा करता येतील याचा विचार करावा व त्या अंमलात आणाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून 100 टक्के कचरा वर्गीकरण, 100 टक्के कचरा संकलन व वाहतुक, शंभरच नव्हे तर 50 किलोहून अधिक कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, हॉटेल, संस्था यांनी आपल्या आवारातच कचरा प्रकल्प राबविणे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता, तलावांची स्वच्छता, मोकळ्या जागांची स्वच्छता अशा विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले.
स्वच्छतेचे मानांकन उंचाविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असताना कुठेही अस्वच्छता असणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करीत सात दिवसांनी विभागवार पाहणी दौरे करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आपल्याला 7 दिवसांचा अवधी असून स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही व या दौ-यामध्ये स्वच्छतेबाबत कुठे हलगर्जीपणा दिसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
हागणदारीमुक्त शहराचे डबल प्लस मानांकन नवी मुंबईला लाभले असून ते टिकविण्यासाठी तशा प्रकारच्या संभाव्य जागांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश देताना स्वच्छतेच्या दृष्टीने कचरा कुंडीमुक्त शहर आवश्यक असून त्यादृष्टीनेही प्रयत्न करावेत. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे व अशा जागांचे सुशोभिकरण करून नागरिकांच्या कचरा टाकण्याच्या सवयीत बदल घडविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आयुक्तांनी विषद केली.
सर्वेक्षणामध्ये नागरिकांच्या प्रतिसादाला महत्व आहे हे लक्षात घेऊन काम करावे. स्वच्छता ॲपवर येणा-या तक्रारी, सूचना यांचे विहित कालावधीत निराकरण करावे व त्याची माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहचवावी असे निर्देशित करण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांना शहराबद्दल आस्था असून शहर स्वच्छतेविषयी शासनामार्फत विचारल्या जाणा-या प्रश्नांची ते सकारात्मक उत्तरे देतील असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.
शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही विशेष लक्ष देऊन रंगचित्रे, शिल्पे याव्दारे आकर्षक भर घालावी व शहराचे स्वरुप लक्षवेधी करावे अशा सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या. तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने आधीपासून सुरु असलेले उपक्रम तसेच सुरु ठेवावेत व त्यामध्ये अधिक नाविन्यपूर्ण भर घालावी असे आयुक्तांनी सांगितले.
स्वच्छता ही नियमित करत राहण्याची गोष्ट असून देशात तिस-या क्रमांकाचा बहुमान मिळाला याचा अभिमान निश्चित बाळगावा, मात्र तेवढ्याने समाधानी न होता तो क्रमांक उंचाविण्यासाठी अधिक जागरूकतेने काम करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आपली स्पर्धा आपल्याशीच आहे हे लक्षात घेऊन आपल्यामधील सर्वोत्तम देऊया व स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने देशात पहिला क्रमांक मिळवूया असा विश्वास व्यक्त केला.
Published on : 05-12-2020 15:01:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update