*डिसेंबरमध्ये कोरोना वाढीचा वेग नियंत्रित मात्र सावधगिरी बाळगणे गरजेचेच* *रूग्ण दुपटीचा कालावधी 357 दिवसांवर - पॉझिटिव्हिटी रेट मध्येही 3.58 इतकी घसरण*
कोरोना नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचीही साथ मिळत असून दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याचा धोका संभवत असताना कोरोना रूग्णसंख्येत मात्र तितकीशी वाढ होत नसल्याचे काहीसे दिलासाजनक चित्र दिसून येत आहे.
मात्र असे असले तरी नागरिकांनी गाफील न राहता मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. यासोबतच याविषयी बेफिकिरी दाखवून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिकांकडून पोलीसांसह तैनात असलेल्या विशेष दक्षता पथकांव्दारे कारवाई करून दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत गांभीर्य राखत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या दिवसांतही कोव्हीड 19 च्या चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. उलट दिवाळीनंतर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. 23 स्थायी चाचणी केंद्रामध्ये आता दोन अद्ययावत चाचणी वाहनांची भर टाकण्यात आलेली आहे. तसेच एपीएमसी मार्केट व एमआयडीसी क्षेत्राप्रमाणेच 5 रेल्वे स्टेशन्सवरही कोव्हीड चाचण्यांची विशेष केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
नोव्हेंबर महिन्यात 72771 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 3730 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. म्हणजेच केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 5.12% इतके होते. *त्यापुढील काळात 1 डिसेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत 31645 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 1136 कोरोनाबाधित आढळले आहेत. म्हणजेच केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 3.58 टक्के इतके कमी झालेले आहे.*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 डिसेंबरपर्यंत एकूण 49387 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 47046 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 1007 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. *इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 95.25 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.03 % हे प्रमाण चांगले आहे.*
*डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 1136 पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून 1384 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 23 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.(मृत्यूदर 2.02%)*
या उपाययोजनांची परिणिती म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी 263 दिवसांवर असलेला *रूग्णदुपटीचा कालावधी (Doubling Rate) 10 दिवसात 357 दिवस इतका सुधारलेला आहे.*
*मृत्यूदरही नियंत्रणात आहे. (2.03 %)*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात *10 डिसेंबर रोजी 1334 ( 2.70 %) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत ॲक्टिव्ह आहेत. 30 नोव्हेंबरच्या तुलनेत (1605 रूग्ण, 3.32 %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत घट झालेली आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना बाधितांवर सुयोग्य उपचार होण्यासाठी नियोजनबध्द व्यवस्था केलेली असून 4 महिन्यांच्या कालावधीत त्यापूर्वी उपलब्ध ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्स व आरोग्य सुविधांत तिपटीने वाढ केलेली आहे. ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या कमी होत चालल्याने महानगरपालिकेच्या 9 कोव्हीड केअर सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रूग्ण दाखल करणे थांबविण्यात आले असले तरी गरज भासली तर केवळ 2 दिवसांत ती केंद्रे पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.
*कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक लसीची उपलब्धता दृष्टीपथात येत असली तरी तोपर्यंत कोरोनापासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्रीच महत्वाची आहे. नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमांतून याविषयी जनजागृती करीत आहे तसेच प्रतिबंधात्मक दंडात्मक कारवाई देखील करीत आहे. तथापि अद्यापही काही नागरिक गांभीर्य पाळताना दिसत नाहीत. तरी स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात न आणता प्रत्येकाने आरोग्य त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 11-12-2020 13:54:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update