*कोव्हीड लसीकरणाच्या पूर्वतयारीचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेकडून विस्तृत आढावा*

कोव्हीडच्या लसीकरणाला नवीन वर्षात सुरूवात होईल अशी शक्यता लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हिड 19 लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठी करण्यात येत असलेल्या नोंदणी, साठवणूक, वितरण व प्रत्यक्ष लसीकरण याच्या पूर्वतयारीचा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बारकाईने आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीचे सदस्य व सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात महानगरपालिका व खाजगी वैद्यकीय सेवेतील कोव्हीड योध्द्यांना लसीकरण केले जाणार असून शासनाच्या को-विन अॅपवर सर्वांची योग्य प्रकारे नोंदणी झाली असल्याची खातरजमा करून घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 42 केंद्रांमधील 4490 कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत 904 संस्थांतील 12431 कर्मचारी अशा एकूण 16 हजार 921 वैद्यकीय कोरोना योध्द्यांचा समावेश आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नोदणी झालेल्या व्यक्तीला लसीकरणाचा दिवस, स्थळ व वेळ याविषयीची माहिती त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर संदेशाव्दारे कळविली जाणार आहे तसेच लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे.
शासकीय सूचनांनुसार लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून प्रत्येक पथकामध्ये 4 व्हॅक्सीनेशन ऑफिसर व 1 व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश असणार आहे. एका केंद्रावर दररोज 100 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.
महानगरपालिकेने को-विन ॲपवर नोंदणी केलेल्या व्यक्तीस लसीकरणाचा संदेश प्राप्त होऊन तो केंद्रावर आल्यानंतर त्याची उपस्थिती नोंदविली जाऊन तेथील नियुक्त अधिकारी यांचेमार्फत त्याचे ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर कोव्हीड सुरक्षेचे सर्व नियम पाळून त्याला प्रतिक्षा कक्षात थांबविले जाईल व नोंदणीच्या क्रमाने लसीकरण कक्षात पाठविले जाईल. लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीस काही काळ निरीक्षण कक्षात थांबविले जाईल व त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. ठाराविक दिवसांच्या अंतराने लसीचा दुसरा डोसही दिला जाणार असून त्याबाबतचा संदेश संबंधितांना नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.
लसीकरण केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या पदासाठी आवश्यक असलेले सुयोग्य प्रशिक्षण देण्याची व्यवस्था तत्पूर्वीच करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे लसीचे संग्रहण, वाहतूक याकरिता आवश्यक शीतसाखळी बाबतचा आढावाही आयुक्तांनी घेतला. या कोव्हीड लसीकरणामुळे नियमित लसीकरण कार्यक्रम सुरळीतपण सुरू राहील याची खबरदारी घेण्याचे यावेळी आयुक्तांनी सूचित केले.
कोव्हीड 19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी अशा कोव्हीड योध्द्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम पूर्वतयारी करण्यात आली आहे.
Published on : 24-12-2020 12:27:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update