स्वच्छता प्रचार रथ करणार नवी मुंबईत प्रभावी जनजागृती


स्वच्छतेमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या सातत्याने वाढत्या मानांकनात नवी मुंबईकर नागरिकांचे महत्वाचे योगदान राहिलेले आहे. मागील वर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये लाभलेले देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये उंचावत पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे.
स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे संदेश दिलेली रंगीत भित्तीचित्रे तसेच सुशोभिकरण यामुळे शहराच्या आकर्षकतेमध्ये लक्षणीय भर पडलेली आहे. नागरिक व नवी मुंबईला भेट देणा-या प्रवाशांकडून त्याची प्रशंसाही केली जात आहे.
स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यामध्ये नागरिकांचे सक्रीय सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने विविध माध्यमांतून नागरिकांच्या मनात स्वच्छतेविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
अशाच प्रकारे स्वच्छतेविषयीच्या जनजागृतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'निश्चय केला - नंबर पहिला' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 4 चित्रमय ' स्वच्छता प्रचार रथ' तयार करण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज महापालिका मुख्यालयाच्या पॅसेजमध्ये प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या समवेत या स्वच्छता प्रचार रथांची अंतिम पाहणी केली व हे स्वच्छता रथ प्रचारासाठी रवाना झाले.
महानगरपालिकेच्या बेलापूर ते तुर्भे या परिमंडळ 1 क्षेत्रात 2 आणि दिघा ते कोपरखैरणे या परिमंडळ 2 क्षेत्रात 2 असे एकूण 4 स्वच्छता प्रचार रथ सकाळी व संध्याकाळी फिरून ध्वनीक्षेपकाव्दारे स्वच्छतेविषयी गाणी, आवाहन प्रसारित करणार आहेत. या स्वच्छता प्रचार रथांच्या संख्येत वाढ करण्याची सूचना याप्रसंगी आयुक्तांनी केली.
नवी मुंबई शहरामध्ये देशात सर्वोत्कृष्ट ठरण्याची क्षमता असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकाने ठरविले तर काही अशक्य नाही असा विश्वास व्यक्त करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही असा निश्चय करावा व तो काटेकोरपणे अंमलात आणावा, आपल्या घरातील कचरा ओला, सुका व घरगुती घातक असा वेगवेगळा ठेवावा व महानगरपालिकेच्या कचरागाडीमध्ये वेगवेगळा द्यावा आणि त्यापुढे जात आपला कचरा ही आपलीच जबाबदारी हे लक्षात घेत खत टोपलीचा वापर करून ओल्या कच-यावर घरातच प्रक्रिया करावी असे आवाहन केले आहे.
Published on : 02-01-2021 14:43:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update