*दुस-या टप्प्यातील कोरोना योध्यांच्या कोव्हीड 19 लसीकरणास प्रारंभ* *पहिल्याच दिवशी दुस-या टप्प्यातील 195 कोरोना योध्यांचे लसीकरण*

16 जानेवारीपासून देशभरात कोव्हीड 19 लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात कोव्हीड काळात आरोग्य विषयक सेवा देणा-या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांना लसीकरण केले जात आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने लसीकरणाचे संपूर्ण नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात 23 हजार 480 आरोग्यकर्मींची नोंद शासकीय कोवीन ॲपवर करण्यात आलेली आहे.
आजपासून दुस-या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून यामध्ये पोलीस, सुरक्षा, स्वच्छता व कोव्हीड नियंत्रक कार्यवाहीत सहभागी असलेले इतर शासकीय, महानगरपालिका कर्मचारी अशा कोव्हीड काळात प्रत्यक्ष कृतिशील असणा-या फ्रन्टलाईन कर्मचा-यांचा समावेश आहे. होते अपोलो रुग्णालय बेलापूर, रिलायन्स हॉस्पिटल खैरणे एमआयडीसी व नमुंमपा सार्वजनिक रुग्णालय ऐरोली या तीन ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे आज फ्रन्टलाईन कर्मचा-यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. या तीन केंद्रांवर दुस-या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी 195 फ्रन्टलाईन कर्मचा-यांना लसीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय पहिल्या टप्प्यातील आरोग्यकर्मींचे नियमित लसीकरण सुरुच असून त्याकरिता 10 रुग्णालयांमध्ये 11 केंद्रे कार्यान्वित आहेत. आजच्या दिवसात 14 केंद्रांवर एकूण 1293 आरोग्यकर्मींना लसीकरण करण्यात आले असून 16 जानेवारीपासून आत्तापर्यंत 7926 आरोग्यकर्मी व 195 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 8121 कोरोना योध्यांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे 15 जानेवारीला 21 हजार व त्यानंतर 19 हजार अशा एकूण 40 हजार कोव्हीड लस प्राप्त झाल्या असून नवी मुंबई महानगरपालिकेने लसींकरीता शीतसाखळी तयार केलेली आहे. प्रत्येक केंद्रावर कार्यरत कर्मचा-यांना सुयोग्य प्रशिक्षण देण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी स्वत: उपस्थित राहून केंद्रांवर पर्यवेक्षण करीत आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग योग्य रितीने लसीकरण व्हावे याकरिता दक्षतेने कार्यरत आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासोबतच शासन निर्देशानुसार दुस-या टप्प्यातील लसीकरणालाही सुरुवात झाली असून ही लस अत्यंत सुरक्षित असून कोवीन ॲपवर नोंदणी झालेल्या कोव्हीड योध्यांना लसीकरणाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यामध्ये नमूद लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-02-2021 07:03:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update