कोरोना चाचणी चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हीड चाचणी केंद्रावर होणाऱ्या कोरोना चाचण्या (RTPCR व Rapid Antigen Test) मोठया प्रमाणात खोट्या दर्शवून, तसा अहवाल शासनाच्या ICMR संकेतस्थळावर प्रसिध्द होत असल्याच्या प्राप्त तक्रारीच्या व स्थानिक वृत्तपत्रामध्ये या संदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने सदर तक्रारीची व बातम्यांची खातरजमा करण्याच्या दृष्टीने तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीने वरील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीस दिलेल्या मुद्यांनुसार सखोल चौकशी करून याबाबतचा 11591 पानी अहवाल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे सादर केलेला आहे.
चौकशी समितीला कार्यकक्षा निश्चित करुन देण्यात आली होती. त्यानुसार –
● नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जुलै पासून रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आलेल्या काही व्यक्तींकडून समक्ष माहिती घेतली जावी व त्यानुसार त्यांची प्रत्यक्षात टेस्ट करण्यात आली आहे किंवा नाही याबाबत खात्री करुन निरीक्षण नोंदविणे.
● महानगरपालिकेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून ॲन्टीजन टेस्ट पॉझिटीव्ह / निगेटिव्ह नोंदीत व्यक्तींना Randomly दूरध्वनी करुन त्यांची टेस्ट करण्यात आली आहे का? व असल्यास त्या कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे याबाबत निरीक्षण नोंदविणे.
● नवी मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या एकूण ॲन्टीजन टेस्ट किटस्, प्रत्यक्षात वापर करण्यात आलेले किटस् व वापर न झालेले किटस् यांची तपासणी करुन सविस्तर अहवाल सादर करणे.
सदर मुद्दयांच्या अनुषंगाने समितीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांची 16 जुलै ते दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत कोरोना चाचणी (Rapid Antigen Test) केली आहे व त्यानुसार सदरचा तपशील केंद्रशासनाच्या ICMR संकेतस्थळावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोंदविला आहे, त्याविषयी नोडल अधिकारी यांनी प्रमाणित करुन दिलेला दिनांकनिहाय तपशील तपासण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांनी Rapid Antigen Test करुन घेतली आहे, त्यांच्याकडून माहिती संकलित करुन घेण्याकरीता 1 लक्ष 51 हजार 956 नागरिकांना महानगरपालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. त्यामध्ये 1 लक्ष 50 हजार 359 नागरिकांनी चाचणी झाली असल्याचे सांगितले व 1597 इतक्या नागरिकांनी कोरोना चाचणी झाली नसल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या (Rapid Antigen Test) करण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी 1845 कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडून कोरोना चाचणी (Rapid Antigen Test) संदर्भात विचारणा करुन माहिती संकलित करण्यात आली. त्यापैकी 1843 नागरिकांनी त्यांची कोरोना चाचणी झाली असल्याचे सांगितले व 02 नागरीकांनी त्यांची कोरोना चाचणी झाली नसल्याचे सांगितले. मात्र त्यांची नावे माहिती नोंदणीकार यांच्या चुकीमुळे ICMR संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे असे दिसते.
चौकशी समितीने मध्यवर्ती औषध भांडारगृहाकडून संपूर्ण अभिलेख उपलब्ध करुन घेतला व त्याची सखोल तपासणी केली. त्यामध्ये एकूण 2 लक्ष 40 हजार इतक्या रॅपिड ॲन्टीजन किट्स खरेदी केल्याच्या नोंदी आढळल्या. त्यामधील 2 लक्ष 13 हजार 604 इतक्या किट्स वापरात आल्या असून 4717 एवढ्या किट्स सदोष / Inconclusive असल्याचे आढळून आले. तसेच मध्यवर्ती औषध भांडारगृह व विविध केंद्रांवर 21 हजार 679 किट्स शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एकूण खरेदी केलेल्या रॅपिड ॲन्टीजन किट्स व करण्यात आलेल्या प्रत्यक्ष चाचण्या याचा ताळमेळ जुळत असल्याचे दिसून आले.
याशिवाय चौकशी समितीच्या माध्यमातून संबंधित नोडल अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
सदर चौकशी समितीने खालील निष्कर्षांसह आपला अहवाल महापालिका आयुक्त यांना सादर केला आहे.
● नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जुलै पासून रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आलेल्या एकूण 1845 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून माहिती नोंदविण्यात आली. त्यानुसार 99.89 % इतक्या नागरिकांनी प्रत्यक्षात कोरोना चाचणी झाली असल्याची माहिती दिली.
● नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून ॲन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह / निगेटिव्ह नोंदीत व्यक्तींच्या यादीतील 1 लक्ष 51 हजार 956 व्यक्तींना रँडमली दूरध्वनी करुन त्यांची टेस्ट करण्यात आली आहे काय व असल्यास कोणत्या ठिकाणी करण्यात आली, याबाबतची माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्षात संपर्क झालेल्या नागरिकांपैकी 98.94 % नागरिकांनी कोरोना चाचणी झाली असल्याची माहिती दिली.
● नवी मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या एकूण ॲन्टीजन टेस्ट किट्स, प्रत्यक्षात वापर करण्यात आलेले किट्स व वापर न झालेले किट्स याबाबत चौकशी समितीस सादर करण्यात आलेले कागदपत्र / दस्तऐवज यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण वापर करण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन किट्सची संख्या 2 लक्ष 13 हजार 604 एवढी आहे, तथापि ICMR संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेल्या चाचणीची संख्या 2 लक्ष 21 हजार 476 एवढी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ICMR संकेतस्थळावर 7872 एवढ्या अतिरिक्त नोंदी झाल्याचे आढळून आले, जे नोंदणीच्या सदोष कार्यपध्दतीमुळे झाल्याचे दिसून येते. यानुसार त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तीय अनियमितता आढळून आलेली नाही.
या समग्र तपासणीमध्ये कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे ही वस्तुस्थिती असली तरी संबंधित व्यक्तीनी दिलेल्या अतिजोखमीच्या संपर्कातील काही व्यक्तींची प्रत्यक्षात कोरोना चाचणी झालेली नसतांनाही अशा व्यक्तींची नावे नोंदीच्या सदोष कार्यपध्दतीमुळे माहिती नोंदणीकार यांच्याकडून ICMR च्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहेत ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे कोरोना चाचणी संदर्भातील प्रत्यक्ष चाचणीचे काम क्षेत्रीय स्तरावर योग्य प्रकारे झाले असले तरी सदर माहिती ICMR च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करताना चुकीची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे. यावरुन केलेल्या चाचणीच्या अनुषंगाने संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्याची कार्यपध्दती सदोष असल्याचे प्रथमदर्शनी निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तसेच ज्या 1597 व्यक्तींनी चाचणी झाली नाही असे प्रतिसाद नोंदविले आहेत त्याबाबत पुन्हा शहनिशा करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे माहिती नोंदणीकार यांनी योग्य ते प्रशिक्षण / मार्गदर्शन / सूचना यांच्या अभावी ICMR संकेतस्थळावर चुकीची माहिती नोंदीत केल्याचे व या कामाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजावर नोडल अधिकारी यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाचा अभाव असल्याचे चौकशी समितीच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. नोडल अधिकारी यांनी कोरोना चाचणीचे संवेदनशील व महत्वाचे कामकाज योग्य प्रकारे होत आहे अथवा कसे याबाबत खातरजमा / पडताळणी केली असल्याचे समितीस दिसून आले नाही. तसेच संबंधित माहिती नोंदणीकार यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारा कोरोना चाचणी संदर्भातील तपशील योग्य आहे अथवा कसे याबाबत नोडल अधिकारी त्याचप्रमाणे संबंधित केंद्र / कॅम्प येथील अधिकारी / कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून खातरजमा न करता ती परस्पर ICMR च्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली असल्याचे दिसून आले आहे. परिणामी 7872 नागरिकांचे कोरोना चाचणी विषयक तपशील हे नोंदणीच्या सदोष कार्यपध्दतीमुळे ICMR च्या संकेतस्थळावर चुकीने नोंदी होऊन प्रसिध्द झाले आहेत.
सदर प्रकरणात चौकशीअंती कोणतीही वित्तीय अनियमितता आढळून आली नसली तरीही, कोव्हीड विषयक कामकाज गांभीर्याने करणे अपेक्षित असून, त्याअंतर्गत नोडल अधिकारी यांनी संबंधितांसोबत समन्वय न ठेवणे व पर्यवेक्षीय नियंत्रणांचा अभाव असणे आणि परिणामी ICMR पोर्टलवर 7872 नावांची चाचणी न होता चुकीच्या नोंदी होणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन नियमानुसार कडक कारवाई करावी असे निष्कर्ष समितीने नोंदविलेले आहेत.
*कोव्हीड चाचण्यांबाबतचे हे काम अत्यंत संवेदनशील व महत्वाचे आहे. यामध्ये डेटा एन्ट्री स्वरूपातील त्रुटी असल्या तरी याचे स्वरूप गंभीर असून दुर्लक्षणीय नाही. एका बाजूला महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी संपूर्ण क्षमतेने कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची कार्यवाही प्रभावीपणे करीत असताना अशा पध्दतीने चूक होणे व त्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे हे स्विकारार्ह नाही. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे जबाबदारी निश्चित करुन आवश्यक कारवाई करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.*
Published on : 25-02-2021 14:27:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update