कोपरखैरणे नोडसह एमआयडीसी मधील स्वच्छतेची आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी केली पाहणी




यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात पहिल्या नंबरचा निश्चय करीत संपूर्ण नवी मुंबई सज्ज झालेली असून आयुक्त श्री. अभिजीत बांगर स्वत: सकाळी 7.30 वाजल्यापासून विविध विभागांना अनपेक्षित भेटी देत स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
आज कोपरखैरणे विभागातील पावणे - खैरणे एम.आय.डी.सी. भागापासून पाहणीला सुरूवात करीत एम.आय.डी.सी. क्षेत्रातील विविध भाग त्याचप्रमाणे पावणेगाव, महापेगांव, श्रमिकनगर, कातकरीपाडा, अडावली भूतावली, कोपरखैरणे सेक्टर 1 ए मधील लघुउद्योग क्षेत्र, सेक्टर 1 ते 11, सेक्टर 15 ते 19, सेक्टर 22, 23, बोनकोडेगांव अशा विविध भागांमध्ये फिरत त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला.
एमआयडीसी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असून कामे सुरू असलेल्या ठिकाणी ग्रीन नेट लावली जावी व या भागात जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही अशाप्रकारे बांधकाम साहित्य व्यवस्थित ठेवलेले असावे असे निर्देश आयुक्तांनी प्रशासन व परिमंडळ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्यामार्फत संबंधितांना दिले.
गांवठाणांमध्ये पायी फिरत पाहणी करताना तेथील गल्ल्या लहान असल्याने तेथील दैनंदिन स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याचे तसेच घरांतून दिला जाणा-या ओला आणि सुका अशा वर्गीकृत कच-याचे संकलन योग्य प्रकारे होण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे गावठाण व झोपडपट्टी सार्वजनिक शौचालयांचा वापर सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांची अंतर्गत स्वच्छता कायम राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कातकरीपाडा याठिकाणी कातकरी बांधवांसाठी घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुल इमारतींच्या बांधकामाची पाहणी करीत ते काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे अडवली भूतावली येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांपैकी ज्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे ती घरकुले तत्परतेने संबंधितांना हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करण्यास त्यांनी सूचित केले.
अडवली भूतावली येथील शाळा इमारतीस भेट देऊन तेथील वेगळ्या प्रकारे सजविलेल्या वर्गखोल्या व स्वच्छतेची आणि विद्यार्थ्यांनी फुलविलेल्या फुलझाडांची पाहणी करीत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
कोपरखैरणे नोडमध्ये विविध सेक्टरमध्ये बांधण्यात आलेल्या मार्केट्सचा उपयोग अधिकृत विक्रेत्यांना आतमध्ये बसवून पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या तसेच सेक्टर 15 मधील भूखंड क्र. 34 वर सुरू असलेले मार्केटचे बांधकाम गतीने करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
सेक्टर 19 ए येथील गणपती धारण तलावाचा जलाशय स्वच्छ असल्याची नोंद घेत इतरही तलावांचे जलाशय अशाच प्रकारे स्वच्छ राहण्यासाठी नियमित स्वच्छता राखली जावी याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्यासोबतच नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच विशेत्वाने तलाव वा नाले यामध्ये कचरा न टाकण्याची खबरदारी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर सकाळी लवकर स्वत: ठिकठिकाणी भेटी देत स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा घेत असल्याने महापालिका अधिकारी, कर्मचारी अधिक सतर्कतेने काम करीत आहेत. त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांनीही आपल्यामुळे शहर अस्वच्छ होणार नाही याची दक्षता घेत सक्रीय सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये आपले नवी मुंबई शहर देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी नागरिकांनी घरातच ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, त्यातील ओल्या कच-याचे कम्पोस्ट बास्केट वापरून खत बनविणे, महानगरपालिकेच्या कचरागाडीत ओला व सुका असा वेगवेगळा कचरा देणे आणि पर्यावरणाची हानी करणा-या प्लास्टिक पिशव्या व इतर प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळणे या अत्यंत सोप्या गोष्टींची सवय लावून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 13-03-2021 12:53:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update