*कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीची सोसायटी पदाधिका-यांवर जबाबदारी*

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत 'मिशन ब्रेक द चेन' ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना बाधीताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध (Contact Tracing) तसेच प्रतिबंधीत क्षेत्राचे (Containment Zone) व्यवस्थापन या दोन विषयांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
ज्या सोसायटीमध्ये कोव्हीड रुग्ण आढळतात त्याठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 पर्यंत कोरोनाबाधीत आढळल्यास तो मजला सील करण्यात येतो व तसा फलक कोरोना बाधीताच्या दरवाजाबाहेर वा मजल्याबाहेर प्रदर्शित करण्यात येतो.
याशिवाय एका इमारतीत 5 पेक्षा जास्त कोरोना बाधीत आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येते व तशा प्रकारचा फलक प्रवेशव्दाराजवळ लावण्यात येऊन तेथील प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येतो. एखाद्या सोसायटीच्या आवारात एकापेक्षा जास्त इमारती आहेत व त्यांची प्रवेशव्दारे स्वतंत्र आहेत. त्यामधील एखाद्या इमारतीमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले तर ज्या इमारतींमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत अशा इमारतीतील प्रवेश प्रतिबंधित करून ती इमारत सील करण्यात येते.
या कन्टेनमेंट क्षेत्राची माहिती संबंधीत विभाग कार्यालयामार्फत त्या सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांना देण्यात येते. तसेच या विषयीची सूचना सोसायटीच्या दर्शनी भागी चिटकविण्यात येते. अशी पहिल्या श्रेणीची 4673 प्रतिबंधित क्षेत्रे (Cointainment Zone) नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आहेत.
अशा सोसायटींमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये (Micro Cointainment Zone) कोणत्याही नागरिकाचा आतमध्ये प्रवेश अथवा बाहेर जाणे प्रतिबधीत असणार आहे.
या विषयीची जबाबदारी संबंधीत नागरिकांप्रमाणेच त्या सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर नियमाचा भंग झालेला आढळल्यास सोसायटीला पहिल्या वेळी रक्कम रू. 10 हजार दंड करण्यात येणार आहे. दुसऱ्या वेळेस रक्कम रू. 25 हजार व तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रक्कम रू.50 हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाची संक्रमण साखळी खंडीत करण्यासाठी कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे असून त्याकरिता सर्व नागरिकांनी व सोसायट्यांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-04-2021 11:06:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update