*कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस (पत्नीस) एकरकमी अनुदान योजना*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस (पत्नीस) एकरकमी अनुदान देणे ही योजना राबविण्यात येत आहे.
मार्च-2020 पासून कोव्हीड-19 या साथरोगामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी कुटुंब प्रभावित झालेली आहेत अशा कुटूंबांना कठीण परिस्थितीच्या काळामध्ये महानगरपालिकेकडून हातभार म्हणून रक्कम रु.25 हजार एकरकमी अर्थसहाय्य या योजनेव्दारे देण्यात येते.
याकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे योजनेच्या अटी / शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यास आयुक्त तथा प्रशासक यांनी दि. 22 मार्च 2021 रोजीच्या ठराव क्र.743 नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर योजनेमध्ये बदल / सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत ज्या महिलेच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा लाभार्थ्यांना यापूर्वी हा लाभ मिळत नव्हता. तथापि हा कालावधी कोव्हीड कालावधी असल्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याबाबत विशेष लक्ष देत या कालावधीत ज्या महिलेच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना या कालावधीपूरती 60 वर्षाच्या वयोमर्यादेत सूट दिलेली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ करत 500 वरुन 1000 लाभार्थी संख्या करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी पतीच्या मृत्यू दिनांकानंतर 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे. याकरिता विहित नमुन्यातील अर्जासोबत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3 वर्ष वास्तव्य असणेबाबतचा पुरावा, लाभार्थी महिलेचे वय 21 ते 60 वर्ष यामध्ये असल्याबाबतचा असणेबाबतचा पुरावा, महिलेचे पॅनकार्ड व आधारकार्डची छायांकीत प्रत, पतीचा मृत्यू दाखला, बॅंक पासबुकची छायांकीत प्रत असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच हे अर्ज बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी, बेलापूर येथील समाजविकास विभागाचे कार्यालय तसेच विभाग कार्यालयात उपलब्ध असून त्याठिकाणीच ते स्विकारले जातील.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना याव्दारे आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा.
Published on : 20-05-2021 13:33:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update