कोरोनाच्या दुस-या लाटेत कोव्हीड बाधीतांची ऑक्सिजन पातळी खालावून त्यांना आयसीयू व व्हेन्टिलेटर्सची गरज भासण्याचे प्रमाण अधिक होते. त्या अनुषंगाने कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी सुरु असताना महानगरपालिकेकडे उपलब्ध डॉक्टर व नर्सेस यांना आयसीयू मधील कोव्हीडबाधीत रुग्णांवरील उपचारांबाबत प्रशिक्षण मिळावे हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार वेबिनारव्दारे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये नामांकित फिजिशियन तथा क्रिटिकल केअर मेडिसिन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अक्षय छल्लानी यांनी महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रातील 300 हून अधिक वैद्यकीय अधिका-यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे सहभागी होत्या.
आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या कोव्हिडबाधीत रूग्णांसाठीच्या क्लिनीकल प्रोटोकॉलबाबत सविस्तर माहिती देत डॉ. अक्षय छल्लानी यांनी सादरीकरणाव्दारे विविध वैद्यकीय बाबींविषयी विस्तृत माहिती दिली त्याचप्रमाणे सहभागी डॉक्टर्सच्या शंकांचे सविस्तर निरसनही केले.
डॉक्टरांनी उपचार करताना आपण कोव्हीड बाधीतांवर उपचार करीत आहोत याची जाणीव ठेवून कोव्हीड लसीकरण झाले असले तरीही पीपीई कीट, फेस शील्डसह इतर सर्व आवश्यक सुरक्षा साधनांचा उपयोग करावा असे डॉ. अक्षय छल्लानी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे उपचारामध्ये योग्य वेळी योग्य औषध (Right Drugs at Right Time) या सूत्राचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी सूचित केले. कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर विशेषत्वाने मधुमेह, किडनीचे विकार असलेल्या काही रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे लक्षात घेऊन उपचारामध्ये स्टिरॉईडचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, आयसीयू कक्ष व्यवस्थापनातील अत्यंत छोट्या बाबींबाबतही डॉ. अक्षय छल्लानी यांनी बारकाईने मुद्देसुद माहिती दिली.
आयसीयू मधील कोव्हीड बाधीत रूग्णांवर उपचार करण्याविषयी डॉ. अक्षय छल्लानी यांनी केलेले मार्गदर्शन व दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे असे सांगत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांनी रूग्णालयीन उपचारांमधील क्षमतावृध्दीसाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेला आयसीयू मधील कोव्हिडबाधीतांवरील उपचार विषयक हा वेबसंवाद डॉक्टरांसाठी लाभदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.