तिस-या लाटेकरिता आरोग्य सुविधा निर्मिती कार्यवाही गतीमान करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश
युरोपीय देशांमध्ये कोव्हिडची चौथ्या लाटेला सुरूवात झालेली असून तिस-या लाटेमध्ये 10 ते 30 वयोगटातील नागरिक जास्त प्रमाणात बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या देशातील पहिल्या व दुस-या लाटेचा अनुभव लक्षात घेता पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते तर दुस-या लाटेत 40 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याचे आढळून येत आहे. दोन्ही लाटेचा तुलनात्मक विचार करता पुढच्या लाटेत बाधितांचा वयोगट उतरताना दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आत्तापासूनच जागरूक रहात कोव्हीड आरोग्य सुविधा व अनुषांगिक बाबींच्या पूर्ततेकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे असे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
इतर देशांतील पहिल्या, दुस-या व तिस-या लाटेच्या आलेखांचा बारकाईने अभ्यास करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याकडे लक्ष दिले जात आहे व याबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. आजच्या आढावा बैठकीमध्ये तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा निर्मिती जलद करण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सध्या कोव्हीडची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत असली तरी ही लाट उच्च पातळीवर असताना एका दिवसातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 12 हजार पर्यंत पोहचल्याचे निदर्शनास आले होते. इतर देशांतील तिस-या लाटेचा अभ्यास करता त्यामध्ये साधारणत: दुपटीने वाढ होईल अशी शक्यता लक्षात घेऊन त्या प्रमाणात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवण्यात आले आहे व तशाप्रकारे तयारी करण्यात येत आहे.
यामध्ये सर्वसाधारण बेड्स, ऑक्सिजन बेड्स वाढीकडे कटाक्षाने लक्ष देतानाच दुस-या लाटेत आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची जाणवलेली गरज लक्षात घेऊन आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यातही संभाव्य तिस-या लाटेत कोव्हीड बाधितांमध्ये मुलांची संख्या अधिक असेल अशी व्यक्त केली जाणारी शक्यता लक्षात घेऊन तशा प्रकारच्या पिडियाट्रिक आरोग्य सुविधा निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणत: सर्वसाधारण बेड्समध्ये 3000, ऑक्सिजन बेड्समध्ये 1500, आयसीयू बेड्समध्ये 500 यापैकी 200 व्हेंटिलेटर्स व 200 बायपॅपची वाढ करण्याच्या दृष्टीने स्थापत्य, विद्युत सुविधा तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य यांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.
आरोग्य सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या प्रमाणात रूग्णवाहिका उपलब्धता असणे गरजेचे आहे याकरिता रूग्णवाहिकांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करून तो तातडीने अंमलात आणण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. तसेच दुस-या लाटेच्या सर्वाधिक प्रभावाच्या काळात जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सध्याच्या प्रस्तावित 4 पोर्टेबल ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची प्रक्रिया अधिक गतीमान करावी व त्यांची संख्या वाढ करण्याच्या दृष्टीने तसेच 3 ठिकाणी ऑक्सिजन स्टोरेज टँक उभारण्याची कार्यवाही करावी असे त्यांनी सूचित केले.
सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून टेस्टींगची केंद्रे वाढविण्यावर भर देण्यात आला असून यापैकी काही मनुष्यबळ वापरून कोव्हीड लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध मनुष्यबळाला आयसीयू वॉर्ड्समधील वैद्यकीय उपचारांचे प्रशिक्षण देऊन तिस-या लाटेसाठी त्याना सज्ज करण्यात येत आहे. त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला.
कोव्हीडसाठी सुविधांमध्ये वाढ केली जात असताना नॉन कोव्हीड सुविधांकडेही विशेषत्वाने प्रसूतीसंबंधित सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिवहन व्यवस्थापक श्री, शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री, निलेश नलावडे, आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सतर्कतेने सर्व काळजी घेत असून नवी मुंबईकर नागरिकांनीही सजग राहून मास्क, सोशल डिस्टन्सींग व सतत हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. विशेषत्वाने 45 वर्षावरील नागरिकांनी पूर्णत: सुरक्षित असलेल्या कोव्हीड लस घेतल्यामुळे आरोग्यातील पुढील गुंतागुंत टाळणे शक्य होते हे लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व स्वत:ला संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 14-06-2021 15:46:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update