ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई
अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे याविषयीच्या प्रतिबंधात्मक कारवाया नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ऐरोली विभाग कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. सेक्टर 1 ऐरोली येथील घर क्रमांक 2030 व घर क्र.1655 तसेच सेक्टर 2 येथील भूखंड क्रमांक बी-171 याठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे एक मजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे सेक्टर 9, दिवागाव, ऐरोली येथील घर क्र. 51 तसेच सेक्टर 3 ऐरोली येथील भूखंड क्र. जे-279 व जे-280 वर तीन मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे विनापरवानगी सुरू होते.
या सर्व बांधकामांना ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसही बजाविण्यात आलेली होती. सदर नोटिशीस अनुसरून संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू संबंधितांनी हे अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामाविरोधात ऐरोली विभागामार्फत धडक मोहीम आयोजित करण्यात येऊन ही बांधकामे निष्कासित करण्यात आली. 1 जेसीबी, 3 मजूर, 1 गॅस कटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर आदी साहित्य या धडक मोहिमेसाठी वापरण्यात आले. यामध्ये ऐरोली विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेसह अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथकाने महत्वाची भूमिका बजावली.
Published on : 09-07-2021 15:10:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update