*तिसरी लाट लांबविण्यासाठी टारगेटेड टेस्टींगला सहकार्य करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे आवाहन*
*युरोपसह अनेक देशांमधील कोव्हीडच्या स्थितीचा अभ्यास करता कोव्हीडची तिसरी लाट येणार हे गृहीत धरूनच उपाययोजना करणे गरजेचे असून जितक्या दूरच्या कालावधीपर्यंत ही संभाव्य तिसरी लाट लांबविता येईल तितकी हानी कमी होईल. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये टारगेटेड टेस्टींग अत्यंत महत्वाचे असून त्यामुळे कोव्हीडची कोणतीही दृश्य लक्षणे नसणारे रूग्ण जलद सापडून कोव्हीडच्या प्रसारावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड टेस्टींग विषयी कोणतीही साशंकता न बाळगता नागरिकांनी टारगेटेड टेस्टींग मोहीमेला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन समाज माध्यमांव्दारे प्रसारित केलेल्या नागरिक सुसंवादामध्ये केलेले आहे.*
मागील महिन्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या स्थिरावताना तसेच काही प्रमाणात कमी होताना दिसत असली तरी जागतिक परिस्थिती लक्षात घेता जपान, इंग्लडसह इतर देशात कोव्हीडची चौथी लाट आल्याचे आढळून येते, त्यामुळे आपल्याकडे तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना तिसरी लाट येणार हे लक्षात घेऊनच ती लांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तिसरी लाट येणार असेलच तर तिला प्रतिरोध करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करणे हा एक उपाय आहे. याव्दारे तिस-या लाटेपासून होणा-या हानीची तीव्रता कमी करता येईल. सद्यस्थितीत नवी मुंबईतील 55 टक्केहून अधिक 18 वर्षांवरील नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून दररोज 20 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाऊ शकेल अशा प्रकारचे नियोजन महानगरपालिकेने केलेले आहे. मात्र लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने मागील काही आठवड्यांपासून आपल्याकडे लसीचा दुसरा डोसच द्यावा लागतो आहे. लसीची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यास दुस-या डोसची प्रलंबितता पूर्ण करून पहिला डोस सुरू करता येईल. तथापि याही परिस्थितीत ज्या व्यक्तींचा सेवाकार्य पुरविताना मोठ्या प्रमाणावर नागरिकांशी संपर्क येतो असे केमिस्ट, सलून, ब्युटी पार्लर, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप येथील कर्मचारी, रिक्षा - टॅक्सी चालक अशा पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स घटकांचे लसीकरण सुरू ठेवण्यात आलेले आहे असे आयुक्तांनी सांगितले आहे.
लसीकरणाप्रमाणेच तिसरी लाट लांबविण्यासाठी करावयाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोव्हीड टेस्टींग असून जास्तीत जास्त प्रमाणात टारगेटेड टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आपण आहे त्याच ठिकाणी रोखू शकलो तर त्याचा पुढील प्रादुर्भाव रोखला जाईल आणि मिशन ब्रेक द चेन ख-या अर्थाने यशस्वी होईल. हीच बाब राज्य टास्क फोर्स तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांनी वेळोवेळी अधोरेखीत केलेली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका मागील 1 महिन्यापासून टारगेटेड टेस्टींगचे धोरण राबवित असून त्यानुसार कोणत्याही इमारतीत अगदी 1 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी त्या इमारतीस हॉटस्पॉ़ट जाहीर करून तेथील सर्व रहिवाशांचे टेस्टींग केले जात आहे. याकरिता संबंधित महापालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉटमध्ये टेस्टींग कॅम्प घेण्यात येत आहे. तेथे अँटिजेन टेस्टप्रमाणेच प्राधान्याने कोमॉर्बिड, ज्येष्ठ नागरिक, कोरोना सदृष्य लक्षणे असणा-या व्यक्ती यांची आरटी-पीसीआर टेस्टही करण्यात येत आहे. महानगरपालिकेची स्वत:ची अत्याधुनिक लॅब असल्याने 24 तासात तपासणी अहवाल मिळत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
तथापि टेस्टींग कॅम्प राबविताना नागरिकांच्या मनात टेस्टींग अनिवार्य का?, मागच्याच महिन्यात टेस्ट केली होती मग आता पुन्हा का?, पॉझिटिव्ह आलो तर काय? अशाप्रकारे टेस्टींगबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचे आढळून आले आहे. वास्तविकत: एखाद्या इमारतीत एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर त्या इमारतीत असलेल्या लिफ्ट, लॉबी, पॅसेज, जिने अशा सार्वजनिक जागांवरून त्या व्यक्तीमार्फत इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच महत्वाचे म्हणजे कोणतीही लक्षणे न दिसणा-या ज्या पॉझिटिव्ह व्यक्ती टारगेटेड टेस्टींग केल्यामुळे आढळतात, त्यांची टेस्ट झाली नसती तर त्या व्यक्ती विविध ठिकाणी फिरल्यामुळे अनेक व्यक्तींच्या संपर्कात येऊन कोव्हीडचा प्रसारक ठरल्या असत्या. त्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग जलद रूग्णशोधासाठी व कोव्हीडला आहे तिथेच रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मागील 4 आठवड्यांपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हॉ़टस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग केले जात असून काही इमारतींमध्ये तर कोणतीही दृश्य लक्षणे नसणा-या 5 किवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. ज्यांची लक्षणे नाहीत म्हणून टेस्ट केली गेली नसती आणि त्यांच्यामार्फत कोव्हीडचा प्रसार झाला असता. त्यामुळे कोव्हीडचा विषाणू आहे तिथेच रोखण्यासाठी हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग अत्यंत महत्वाचे असून त्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आयुक्तांनी अधोरेखित केलेली आहे.
*लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्टींग करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी असून 15 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 13 लाखाहून अधिक टेस्टींग झालेले असून मागील 15 दिवसात 1 लाखाहून अधिक टेस्टींग केल्याची माहिती देत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबची क्षमतावृध्दी 5 हजार प्रतिदिन टेस्ट्स इतकी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.*
सद्यस्थितीत काही देश चौथ्या लाटेला सामोरे जात असून आपल्याक़डील संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. कोव्हीड अनुकूल वर्तन करताना मास्कचा योग्य प्रकारे वापर, चेह-याला स्पर्श न करणे, हात वारंवार स्वच्छ करणे या गोष्टीचा अंगिकार करणे गरजेचे आहे. अंगिकार करणे म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे वापर करणे नव्हे तर या गोष्टी आपल्या दैनंदिन सवयींचा टाळता न येणारा भाग बनविणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
त्यासोबतच कोव्हीड टेस्टींग बाबतची मनातील साशंकता नागरिकांनी दूर करणेही तितकेच गरजेचे असून टेस्टींगमुळे योग्य वेळेत निदान होऊन कोव्हीडचा प्रसार आहे तिथेच रोखला जाईल. त्यामुळे ही टेस्टींगची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत आयुक्तांनी तिसरी लाट जास्तीत जास्त लांबविण्याचा टारगेटेड टेस्टींग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
*तिसरी लाट जितकी दूर जाईल तितका उपायायोजनाकरिता अधिक कालावधी मिळेल, ज्यामध्ये जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित होतील तसेच कोव्हीड यंत्रणा सुसज्ज करण्यासाठीही पुरेसा कालावधी उपलब्ध होईल व त्यामुळे तिस-या लाटेपासून होणारी हानी कमी होईल. या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या इमारतीत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्यास त्याठिकाणी होणा-या टेस्टींग प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य करावे आणि लोकप्रतिनिधींनीही यासाठीच्या जनजागृती कार्यात सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नागरिक सुसंवादामध्ये केले आहे.*
Published on : 22-07-2021 07:10:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update